पावसाने दीड महिना उडविली रेल्वेची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:34 AM2019-08-19T11:34:36+5:302019-08-19T11:36:20+5:30

जून महिन्यातील शेवटच्या दोन दिवसांपासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत तब्बल दीड महिने शेकडो गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली..

Rain created problem almost one and a half month | पावसाने दीड महिना उडविली रेल्वेची झोप

पावसाने दीड महिना उडविली रेल्वेची झोप

Next
ठळक मुद्देमध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे विस्कळीत

पुणे : पावसाळा सुरू झाला की मुंबईत रेल्वेमार्गावर साठणारे पाणी आणि कर्जत-लोणावळादरम्यान घाटात दरडी कोसळण्याची नेहमीच भीती असते. त्यामुळे दरवर्षी या काळात अधुन-मधून रेल्वेसेवा विस्कळीत होते. पण यंदाचा पावसाळा आतापर्यंत रेल्वेची झोप उडविणारा ठरला आहे. जून महिन्यातील शेवटच्या दोन दिवसांपासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत तब्बल दीड महिने शेकडो गाड्या रद्द करण्याबरोबरच अंशत: रद्द, मार्गात बदल करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. 
पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात २९ व ३० तारखेला मुंबईतील धुवांधार पाऊस झाला. या पावसाने मुंबईतील रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली होती. काही गाड्या रद्द करण्याबरोबरच विलंबानेही धावत होत्या. तेव्हापासून रेल्वेच्या परीक्षेचा काळ सुरू झाला. लगेच पुढचे चार दिवस पुणे-मुंबईदरम्यानच्या सेवेवर विपरीत परिणाम झाला. १ जुलै रोजी जामरूंग ते ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मुंबईतून पुण्याकडे गहू घेऊन येणारी मालगाडी घसरली. त्यानंतर सलग दोन दिवस दोन्ही शहरादरम्यानच्या इंटरसिटी एक्सप्रेससह लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर पुढील दोन दिवस सिंहगड व प्रगती एक्सप्रेस रद्द केली. लांबपल्याच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. त्यानंतर ८ जुलैला ठाकुरवाडी आणि मंकीहिलदरम्यान मोठी दरड कोसळली. तब्बल दोन मीटर लांबीचे दगड रेल्वेमार्गावर आले होते. दुपारी ३.२० वाजता ही दरड कोसळली होती. त्यानंतर दुसºया दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या दरम्यानच्या सर्व गाड्या तीन ते चार तास विलंबाने धावल्या.
पावसाने पुढील १५ दिवस काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, आधीच्या मुसळधार पावसामुळे या काळात घाटा क्षेत्रात मोठे दगड, माती रेल्वेमार्गावर येण्याच्या घटना अधूनमधून घडतच होत्या. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी घाट क्षेत्रात ठाण मांडून होते. पावसात पुन्हा दरडी कोसळू नयेत म्हणून रेल्वेने घाट क्षेत्रात विविध उपाययोजना करण्यासाठी २६ जुलै ते ९ आॅगस्ट या दरम्यान प्रगती, डेक्कन एक्सप्रेस, पुणे-पनवेल पॅसेंजरसह लांबपल्याच्या काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. पण २६ जुलैपासून १५ ऑगस्टपर्यंत पावसाने रेल्वेची अक्षरश: झोप उडविली.  
...
जुलैपासून सतत रेल्वेसेवा राहिली विस्कळीत

२७ जुलैला अंबरनाथ, बदलापुर, वांगणी येथे उल्हास नदीला आलेल्या पुराने रेल्वेमार्गाला वेढा घातला. या पुरात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती. गाडीला प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढताना सर्वच यंत्रणांचे धाबे दणाणले होते. या पावसाने मुंबई-पुणे दरम्यानच्या काही गाड्याही रद्द कराव्या लागल्या. ३० जुलैला पळसदरी स्थानकादरम्यान दरड कोसळली. तर ३ आॅगस्टला रात्री मकी हिलजवळ मोठी दरड कोसळल्याने तसेच रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाल्याने स्वातंत्र्यदिनापर्यंत एकही गाडी पुणे-मुंबईदरम्यान धावली नाही. रेल्वेसाठी हा काळ खुप कठीण होता. मागील दिवस या मार्गावर गाड्या धावत आहेत. पण पावसाळा अजून संपलेला नाही, त्यामुळे रेल्वेला ‘परीक्षे’साठी सतत दक्ष राहावे लागणार आहे.असा झाला रेल्वेचा खोळंबा
- दि. २९, ३० जून - मुंबईत पावसाने गाड्यांना विलंब
- दि १ ते ४ जुलै - ठाकुरवाडी-जामरूंग स्थानकादरम्यान मालगाडी घसरली, रेल्वे ठप्प
- दि. ८ जुलै - ठाकुरवाडी आणि मंकीहिलदरम्यान दरड कोसळली, १४ तास वाहतुक विस्कळीत
- दि. २६ जुलै ते ९ ऑगस्ट - उपाययोजनांसाठी काम हाती घेतल्याने काही गाड्या रद्द
- दि. २७ ते २९ जुलै - मुसळधार पावसाने मुंबई विभागातील रेल्वेमार्ग पाण्याखाली. महालक्ष्मी पुरात अडकली, काही गाड्या रद्द
- ३० जुलै - पळसदरी स्थानकादरम्यान दरड कोसळली
- दि. ३ ते १५ ऑगस्ट- ३ ऑगस्टला रात्री मंकीहिलजवळ दरड कोसळली. पुढील बारा दिवस रेल्वे ठप्प

Web Title: Rain created problem almost one and a half month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.