राज्यात धरणक्षेत्रात पाऊस
By admin | Published: July 17, 2017 02:05 AM2017-07-17T02:05:52+5:302017-07-17T02:05:52+5:30
पश्चिम वऱ्हाडात अकोला जिल्हा वगळता रविवारी वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. कोल्हापूर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम वऱ्हाडात अकोला जिल्हा वगळता रविवारी वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. कोल्हापूर व नाशिकमध्येही धरणक्षेत्रात पाऊस झाला. नाशिकला गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मराठवाड्यात मात्र लातूर वगळता इतर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरीसह सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी २३ फुटांपर्यंत पोहोचली असून, अकरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी, कासारी धरणक्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी सुरू आहे. राधानगरी धरण ६४ टक्के भरले आहे.
सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. धरणातील पाणीसाठा १८.४८ टीएमसी झाला आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे रविवारी पावसाची संततधार सुरू होती. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात सध्या ४५.४४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
विदर्भात रविवारी सकाळपासून वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरु झाला तर बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुका वगळता समाधानकारक पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा आहे. तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात रविवारी सर्वदूर पाऊस झाला.