पावसाचा थेंब न् थेंब साठविला!
By Admin | Published: June 2, 2016 02:26 AM2016-06-02T02:26:36+5:302016-06-02T02:26:36+5:30
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व असल्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने जलपुनर्भरणासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीतच मुरविले पाहिजे
मुंबई : पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व असल्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने जलपुनर्भरणासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीतच मुरविले पाहिजे, या उद्देशाने विद्यापीठाच्या परिसरात एक एकर क्षेत्रात पाझर तलाव व दुसरीकडे भल्या मोठ्या शेततळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून दरवर्षी पावसाच्या कोट्यवधी लीटर पाण्याची जमिनीत साठवणूक केली जात आहे. जलपुनर्भरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीला उभारलेल्या शेततळ्याची साठवण क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव असून, त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात विविध विभागांच्या
लहान-मोठ्या अशा एकूण ६६
इमारती आहेत. या इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी वाहून वाया जाऊ नये म्हणून प्रत्येक इमारतीवर (रूफ वॉटर हार्वेस्टिंग) जलपुनर्भरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतींच्या छतावर पडणारे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून विद्यापीठाच्या आवारातील बंधाऱ्यांमध्ये सोडले जाते. या बंधाऱ्यांद्वारे ते पाणी जमिनीत मुरते.
विद्यापीठाचा परिसर हा डोंगरमाथ्यावर वसलेला आहे.
त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी उंच भागावरून उताराच्या दिशेने वाहून जात होते. या पाण्याचा सदुपयोग व्हावा, म्हणून विद्यापीठ प्रशासनाने ठिकठिकाणी ३० ते ३५ बंधाऱ्यांची निर्मिती केली. पावसाचे पाणी या बंधाऱ्यांमध्ये साठवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे पावसाचे पाणी विद्यापीठाच्या आवारातच जमिनीत मुरते. परिणामी तेथील
विहिरी पुनरुज्जीवित होण्यास मदत झाली. इमारतींच्या रूफ वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेद्वारे छताचे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून याच बंधाऱ्यांमध्ये साठवले जाते. विद्यापीठातील मोकळ्या असणाऱ्या सुमारे ३५० एकर क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी या सर्व बंधाऱ्यांमध्ये येऊन साचते. विद्यापीठाच्या आवारात असलेल्या एक एकर क्षेत्रात पाझर तलाव उभारला आहे. या तलावाची साठवण क्षमता ३ कोटी २० लाख लीटर असून, तो १८ फूट खोल आहे. हा तलाव पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरल्यावर ओव्हरफ्लो होतो. त्यामुळे पाणी वाहून वाया जाऊ नये, म्हणून तलावाच्या शेजारीच शासनाच्या निधीतून एक शेततळे तयार करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)