कोकण वगळता पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:44 AM2017-09-01T04:44:55+5:302017-09-01T04:45:00+5:30
राज्यात कोकण वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतही पाऊस पूर्णपणे थांबला आहे. २ ते ४ सप्टेंबरदरम्यान कोकण-गोव्यात बºयाच ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल
पुणे : राज्यात कोकण वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतही पाऊस पूर्णपणे थांबला आहे. २ ते ४ सप्टेंबरदरम्यान कोकण-गोव्यात बºयाच ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
सौराष्ट्र व लगतच्या गुजरात प्रदेशाच्या उत्तरेकडील भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता कच्छ व लगतच्या दक्षिण पाकिस्तान आणि ईशान्य अरबी समुद्राच्या भागावर आहे़ कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र आता विरून गेले आहे़ त्यामुळे गेले तीन दिवस धुमशान कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे़ गुरुवारी दिवसभरात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावरही जोरदार सरी पडल्या.
पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईत दिवसभर चांगलेच ऊन पडले होते़ दोन दिवस असलेला हवेतील गारवा अचानक बंद झाल्याने मुंबईकर उन्हाने काही प्रमाणात हैराण झाले़ पाऊस थांबल्याने गौरी-गणपतीचे विसर्जन मात्र उत्साहात झाले़