कोकणात पावसाचा जोर ओसरला, मराठवाड्यात भिजपाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 05:15 AM2018-07-15T05:15:18+5:302018-07-15T05:15:29+5:30
सलग तीन दिवस मुसळधार बरसल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने कोकणवासीयांनी दिलासा मिळाला आहे.
मुंबई/पुणे : सलग तीन दिवस मुसळधार बरसल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने कोकणवासीयांनी दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर परिसरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी भिजपाऊस झाला.
पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तीन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी तसेच १६ जुलैला मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
कोकणात पावसाचा जोर ओसरला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातपावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. अधूनमधून हलक्या सरी पडत होत्या. संगमेश्वर तालुक्यात तळेकांटे येथे मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात बºयापैकी पाऊस झाला. उर्वरित भागात हलक्या सरी पडल्या.
नगर जिल्ह्यात भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊश झाला. घाटघर येथे २४ तासांत तब्बल सव्वा सात इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
मराठवाड्यात भिजपाऊस
अर्ध्या मराठवाड्यात भिजपाऊस झाला. जालना शहरासह परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यात दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने कोमेजू लागलेल्या कपाशी, मका, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला आहे. बीड शहरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. वडवणी तालुक्यात दहा दिवसांनी रिमझिम पाऊस झाला. केज, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई तालुका तसेच परभणी जिल्ह्यात दिवसभर भुरभूर पाऊस होता.
>शनिवारी दिवसभरात महाबळेश्वर ३९, जळगाव ६, नाशिक २, सांगली, सातारा ३, मुंबई १, सांताक्रूझ ७, अलिबाग ३, भिरा ३०,औरंगाबाद ७, बुलढाणा १९, गोंदिया येथे ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़