पश्चिम महाराष्ट्रात पडला गारांसह पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 05:32 AM2019-04-14T05:32:16+5:302019-04-14T05:32:36+5:30
जिल्ह्यात शनिवारी गारांसह झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी हा पाऊस द्राक्ष आणि इतर फळपिकांना नुकसानकारक ठरला आहे.
मुंबई/कोल्हापूर/पुणे/सोलापूर : चाळिशी पार केलेला उन्हाचा पारा अन् हैराण करणारा उकाडा अशा परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी गारांसह झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी हा पाऊस द्राक्ष आणि इतर फळपिकांना नुकसानकारक ठरला आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही रात्री काही भागांत पाऊस पडला.
गेले पंधरा दिवस राज्यातील उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. शनिवारी विजेचा कडकडाटासह कोल्हापूर शहर व जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला. सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वारे व गारांसह जोरदार पाऊस पडला. शिराळा, वाळवा, तासगाव तालुक्यातही गारांसह पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण होते.
सातारा शहरासह शहराच्या पश्चिमेस कास परिसरात शनिवारी सायंकाळी मेघगर्जनेह पावसाने हजेरी लावली. कास परिसरात मोठ्या प्रमाणावर गारांदेखील पडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस पडतच होता. पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला़ बारामतीतील सुपा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरु असतानाच पावसाच्या सरी आल्या़ सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. सायंकाळचा हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. शनिवारी पहाटेपर्यंत १.६ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती.
शनिवारी सायंकाळी कोल्हापूर व महाबळेश्वर येथे १ आणि सातारा येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली.
>एक ठार
शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी वाºयाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे महादेव सिद्धाराम दिंडोरे (१३) हा मुलगा ठार झाला.
राज्यासाठीचा अंदाज
१४ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१५ एप्रिल : मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह वादळी पाऊस पडेल.
१६ एप्रिल : विदर्भात गारा पडतील.
१७ एप्रिल : मराठवाडा, विदर्भात तुरळक पाऊस पडेल.