पावसाची रात्री पुन्हा हजेरी
By admin | Published: September 20, 2016 02:32 AM2016-09-20T02:32:47+5:302016-09-20T02:32:47+5:30
गुरुवारपासून रविवारपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने अखेर सोमवारी उघडीप घेतल्याने मुंबईकरांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला.
मुंबई : गुरुवारपासून रविवारपर्यंत कोसळणाऱ्या पावसाने अखेर सोमवारी उघडीप घेतल्याने मुंबईकरांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला. चार दिवस सलग कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांचे अक्षरश: हाल झाले होते. सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी किंचितसा बरसलेला पाऊस वगळता उर्वरित काळ कडक ऊन पडल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. दरम्यान, सकाळ, दुपार आणि सायंकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर पकडल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत शहरात २८.२४ मिलीमीटर, पूर्व उपनगरात २०.३७ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात १९.५१ मिलीमीटर पाऊस पडला. सोमवारी सकाळी पडलेल्या ऊन्हानंतर दुपारी काही काळ शहरात ढगांनी गर्दी केली होती. मात्र किंचित बरसलेल्या सरींनी पुन्हा उघडीप घेतली. पुन्हा ४ वाजेपर्यंत पडलेल्या उन्हानंतर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना सुरूच असून, शहरात १, पूर्व उपनगरात ६ अशा एकूण ७ ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग पडला. शहरात ५, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण १२ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ८, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ११ अशा २२ ठिकाणी झाडे पडली. यात मनुष्यहानी झाली नाही. (प्रतिनिधी)