पावसाचा मच्छिमारांना फटका
By admin | Published: March 1, 2015 10:16 PM2015-03-01T22:16:03+5:302015-03-01T23:14:30+5:30
नौका बंदरात उभ्या : बाजारपेठेत मच्छिची आवक घटली
मालवण : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा, काजू बागायतदारांबरोबरच मत्स्य व्यवसायावरही झाला असून अवकाळी पाऊस आणि त्यातच सोसाट्याचा वारा यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे बाजारपेठेत माशांची आवक घटली असून माशांचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. समुद्रात ताशी ५० किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून रविवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारठा होता. ही परिस्थिती आणखी आठवडाभर राहणार असल्याची शक्यता जाणकार मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.किनारपट्टीवर शनिवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. अचानक बदललेल्या वातावरणामुळे पहाटे १.३० वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. यानंतर पहाटे ४ वाजेपर्यंत किनारपट्टी भागात संततधार सुरू होती. रविवारी दुपारपासूनही पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व हवेत गारठा असल्यामुळे त्याचा परिणाम आंबा बागायती तसेच मासेमारी व्यवसायावरही दिसून येणार आहे.समुद्रात ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. समुद्रातील अचानक बदललेल्या हवामानामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. यामुळे मच्छिमारी व्यवसाय थंडावला आहे. यामुळे बाजारात माशांची आवक घटली असून माशांचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी ३०० ते ३५० रूपये किलो दराने विकली जाणारी सुरमई आज ५०० रूपये किलो दराने विकली जात होती. बांगुरडी १०० रूपये वाटा तर धोडये ५० रूपये वाटा अशा चढ्या दराने बाजारात मासे विकले जात होते. मासे महाग झाल्यामुळे मत्स्य खवय्यांनी चिकन-मटणवर जोर दिल्याचे दिसून आले. बाजारात भाज्यांचेही भाव दिवसभरात वाढलेले होते.
किनारपट्टीवर ढगाळ वातावरण अधूनमधून पाऊस व जोरदार वारा असाच आठवडाभर सुरू राहणार असल्याचा अंदाज स्थानिक जाणकार मच्छिमारांनी व्यक्त केला आहे. मासेमारीबरोबरच या बदललेल्या वातावरणाचा फटका आंबा बागायतीला बसणार आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहोरांवर बुरशीचा प्रादूर्भाव वाढणार आहे. तसेच तुडतुडा व किडरोगाच्या वाढीस ढगाळ वातावरण पोषक असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या मुंबई मार्केट हजार ते दीड हजार रूपये डझन दराने आंबा विकला जात आहे. कोकणात अवकाळी पडलेल्या पावसामुळे तयार झालेल्या आंबा फळांवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. गेल्यावर्षी फळमाशीच्या कारणावरून पाश्चिमात्य देशांनी आंबा नाकारल्यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडला होता. यावर्षी अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांवर पुन्हा आपत्ती आली आहे.
कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी करून शासनाला तसा अहवाल पाठविण्याची मागणी आंबा बागायतदारांकडून सुरू झाली
आहे. (प्रतिनिधी)
मालवणात चिखलाचे साम्राज्य
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मालवण शहरात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शहरात भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसामुळे या ठिकाणी चिखल पसरला आहे. याचा फटका वाहनचालक व पादचाऱ्यांना बसत आहे. पावसामुळे शहरात व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसभरात बीएसएनएलची सेवा मात्र सुरळीत सुरू होती.