पावसाचे धुमशान, हजारोंना वाचवले; राज्याला पुराचा विळखा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 04:04 AM2019-08-05T04:04:52+5:302019-08-05T06:41:01+5:30
अनेक गावांचा संपर्क तुटला; कोल्हापूर-मुंबई मार्ग बंद, पंचगंगेची ४६ फुटांकडे वाटचाल
मुंबई/पुणे : मुंबईसह कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात धुवाधार पावसाने धुमशान घातले असून, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले आले आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीची ४६ फुटांकडे वाटचाल सुरू असून, ८६ बंधारे पाण्याखाली गेल्याने पुराचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मराठवाडा आणि विदर्भ वगळता उर्वरित राज्यात वरुणराजाने पावसाची पूर्ण कसर भरून काढली आहे. उत्तर महाराष्ट्र कोकण, मध्य महाराष्ट्रात आणखी चार दिवस जोरदार पाऊस राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिकसह अन्य तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. गोदावरी नदीसह अन्य नद्यांना महापूर आला आहे. गंगापूर धरणात ९४ टक्के पाणीसाठा झाल्याने ४५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
नांदूरमधमेश्वर येथून १ लाख ५८ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सायखेडा आणि चांदोरीला पुराचा वेढा पडला आहे. त्याठिकाणी एनडीआरएफचे पथक बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे, तर नाशिक शहरात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पुरात अडकलेल्या किमान दोनशे ते अडीचशे जणांना स्थलांतरित करण्यात आले.
गोदावरी नदीवरील बहुतांशी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरले. सुरक्षिततेचा भाग म्हणून सोमवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालयाने सुटी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची ४६ फुटांकडे वाटचाल सुरू असून ८६ बंधारे पाण्याखाली गेल्याने पुराचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. ११ गावांचा संपर्क तुटला असून, दीड हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरित केले गेले आहे. १० तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने इतर पाच जिल्हा मार्ग व पाच ग्रामीण मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद २० हजार ४७२ घनफूट विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पुराचे पाणी अस्ताव्यस्त पसरले आहे. शिवाय राधानगरीसह लहान धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे पंचगंगेची पातळी ४५.३ फुटांच्या वर पोहोचली आहे.
सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होत असून, कृष्णा, वारणा नदीकाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या हजारो घरांना, पिकांना आता जलसमाधी मिळत आहे. नागरिकांच्या स्थलांतराबरोबरच आता व्यापारी पेठांमधील साहित्याचेही स्थलांतर सुरू झाले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू असून, कृष्णा आणि कोयना नदीतील पाण्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ९६.७५ टीएमसीपर्यंत पोहोचल्याने धरणाचे सहा दरवाजे ११ फुटांपर्यंत वर उचलण्यात आले. त्यामधून ६७ हजार ९१३ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुके आणि १९ महसूल मंडळात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत अतिवृष्टी झाल्याने जिल्हा जलमय झाला आहे. अहमदनगरमध्ये मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा बसला. भंडारदरा धरणातून
दुपारी २१ हजार ३५७ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भीमा, मुळा, प्रवरा, गोदावरी नदीला पूर आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या दोनशे कुटुंबांना हलविण्यात आले आहे. गोदावरीचे पाणी कोपरगाव शहरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठ परिसरातील तीनशे कुटुंबांना हलविण्यात येणार आहे. दरम्यान, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी आहे़ संपूर्ण मराठवाड्यात १८ टक्के तर विदर्भात ३ टक्के पावसाची तूट आहे़
मराठवाड्यावर ढग नुसतेच येतात नि जातात
मुंबई, प. महाराष्टÑ व कोकणात वरुणराजाने अक्षरश: थैमान घातले असताना मराठवाडा मात्र नेहमीप्रमाणेच अजूनही तहानलेलाच आहे.
केवळ रिमझिम व भुरभुरीइतकीच कृपादृष्टी पावसाने मराठवाड्यावर ठेवली आहे. शनिवारी नांदेड व हिंगोली जिल्ह्यांच्या काही भागांत अतिवृष्टी झाली होती. पण रविवारी तोही जोर ओसरला. नांदेड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांच्या काही भागांत अधूनमधून रिपरिप होत आहे. दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरात संततधारेसारखी परिस्थिती असली तरी पावसात अजिबात जोर नाही. परिणामी, मराठवाड्यातील धरणे, लहान- मोठे बहुतांश प्रकल्प अद्यापही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
नाशिकला पूर आल्यामुळे थोडेफार पाणी जायकवाडीत सोडण्यात आले, हीच मराठवाड्यासाठी थोडी समाधानाची बाब आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे.
पुढे काय होणार?
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकणात सोमवारी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून पुढील चार दिवस अनेक ठिकाणी पाऊस राहील़ मराठवाड्यात सोमवारी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात सोमवारी सर्वदूर हलका पाऊस होईल़
गेल्या २४ तासांत झालेला पाऊस (मिमी)
पेण ४९०, तुलसी ४४०, अलिबाग, ताम्हिणी ४१०, दावडी ४००, शिरगाव ३९०, लोणावळा (आॅफिस), डुंगरवाडी, बेलापूर, विहार तलाव ३४०, कल्याण, अंम्बोणे, लोणावळा (टाटा) ३३०, विक्रमगड, वाडा, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर ३१०, कर्जत २९०, अप्पर वैतरणा २८०, अंबरनाथ, भिरा २७०, हरसूल २६०, सुधागड पाली २५०, खालापूर, उल्हासनगर २४०, मुरुड, २३०, मोखेडा, इगतपुरी, श्रीवर्धन २२०, म्हसळा, रोहा २१०, महाड, मुंबई (सांताक्रुझ), मुरबाड, वसई, पेठ २००, धाडगाव, पौड मुळशी, पालघर, शहापूर खोपोली, खंद १९०, संगमेश्वर, देवरुख, उरण, सुरगाणा १८०, भिवंडी, खेड, लांजा, मंडणगड, माणगाव, पनवेल, ओझरखेडा १७०, अक्कलकुवा, चिपळूण, कोयना (नवजा) १६०, पोलादपूर, रत्नागिरी, वालपोई, भिवपूरी १५० मिमी़