आनंदसरींचा आजपासून वर्षाव! मान्सून १५ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:52 AM2020-06-10T07:52:44+5:302020-06-10T07:52:53+5:30
अनुकूल वातावरण : मान्सून १५ जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार
मुंबई/पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला किंचित ब्रेक लागला होता. मात्र आता निसर्ग चक्रीवादळ शमले असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. परिणामी बुधवारी तो गोवा आणि तळकोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, मान्सूनने मंगळवारी बंगालच्या उपसागरातील काही ठिकाणांहून आगेकूच केली आहे. त्यानुसार १० अथवा ११ जून रोजी मान्सूनचे गोवा, तळकोकणात आगमन होईल़ त्यानंतर १४ किंवा १५ जूनपर्यंत वेगाने वाटचाल करीत तो संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे़ पुणे जिल्ह्यात १२ किंवा १३ जून, मुंबईत १३ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे़
१२ जूनपासून अधिक सक्रीय
सध्याची स्थिती विचारात घेता राज्यात १२ जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल.
त्यामुळे सर्वत्र दमदार पाऊस होऊन १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यभरात मान्सूनची वृष्टी सुरू होईल.
तळकोकणातून पुढे सरकताना पुणे व नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल, असाही इशारा देण्यात आला आहे़