Rain in Cold Wave: उन पाऊस नाही, आता थंडी पाऊस! महाराष्ट्राच्या मोठ्या भागात पाऊस पडणार; वाढविली धाकधुक...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 03:24 PM2023-01-04T15:24:02+5:302023-01-04T15:24:27+5:30
मुंबईचे किमान तापमान १५ अंशावर आले आहे. दोन महिने उशिराने का होईना लोकांना थंडी अनुभवता आली होती.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पारा उतरला होता. यामुळे दोन महिने उशिराने का होईना लोकांना थंडी अनुभवता आली होती. परंतू, आता याच थंडीत पाऊसही अनुभवावा लागणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात पुढील दोन दिवसांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
आग्नेय उत्तर प्रदेश ते पश्चिम विदर्भापर्यंत प्रणालीमुळे (Trough) पुढील २ दिवसांत दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबईचे किमान तापमान १५ अंशावर आले आहे. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानचे किमान तापमान १८ अंश एवढे असल्याने मुंबईकरांना सध्या माथेरानपेक्षाही अधिक थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांशी शहरांचा किमान तापमानाचा पारा १५ अंशाखाली नोंदविण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नववर्षात महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतानाच मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक आहे. हा प्रभाव उत्तर भारतातून राजस्थान, गुजरातमार्गे कोकणात उतरत आहे.
थंडी वाढणार
खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा खालावलेले आहे. येथेही काहीशी थंडी जाणवत आहे. हळूहळू उत्तरेतील पश्चिमी प्रभावामुळे थंडी वाढू शकते.
अपेक्षित थंडी नाही
उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असून, अपेक्षित थंडी सध्या जाणवत नाही. तरी येत्या काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.