Rain in Diwali: दिवाळीही पावसात भिजणार; उष्ण लाटांमुळे रेंगाळली परतीच्या पावसाची पावले
By रूपेश उत्तरवार | Published: October 14, 2022 06:36 AM2022-10-14T06:36:51+5:302022-10-14T06:37:15+5:30
राज्यातून पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परत जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक भुईसपाट होत आहे.
- रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परतीच्या पावसाचे गणित २०१० पासून बिघडले आहे. साधारणत: १७ सप्टेंबरला राजस्थानातून माघारी फिरणारा पाऊस यंदा २३ सप्टेंबरपासून माघारी फिरत आहे. मात्र, उष्ण लाटांमुळे राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे.
राज्यातून पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परत जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक भुईसपाट होत आहे. शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामातील पेरणीच्या तारखाही बदलाव्या लागतील, असे मत हवामान अभ्यासक नोंदवीत आहेत.
दिवाळीतही पाऊस
मुंबई : परतीच्या पावसाचे वेध लागले असताना मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. शनिवारनंतर पाऊस थांबणार असला तरी दिवाळीदरम्यान २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१४ ऑक्टोबर - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर (यलो अलर्ट)
१५ ऑक्टोबर - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (यलो अलर्ट)
१६ आणि १७ ऑक्टोबर - संपूर्ण महाराष्ट्र (ग्रीन अलर्ट)
पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रात मोठे बदल
पृथ्वीवरील तापमानात सतत वाढ होत आहे. पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. यातून हवामानात मोठा बदल होत आहे. कमी दाबाचे पट्टे वारंवार तयार होतात. वातावरणात भोवऱ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने ढगफुटीसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातून नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
दहा वर्षांत कधी परतला पाऊस?
वर्ष तारीख
२०१० ११ ऑक्टोबर
२०११ १३ ऑक्टोबर
२०१२ १५ ऑक्टोबर
२०१३ १९ ऑक्टोबर
२०१४ १४ ऑक्टोबर
२०१५ १५ ऑक्टोबर
२०१६ १८ ऑक्टोबर
२०१७ २९ ऑक्टोबर
२०१८ १८ ऑक्टोबर
२०१९ १२ ऑक्टोबर
२०२० १९ ऑक्टोबर
२०२१ २० ऑक्टोबर
२०२२ अजून अनिश्चित