कोकण, प.महाराष्ट्र, विदर्भात धो धो; कोकणात पुराचा धोका, अमरावतीतही पूरस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 07:39 AM2022-07-06T07:39:51+5:302022-07-06T07:40:12+5:30
कोल्हापुरात १९ बंधारे पाण्याखाली, अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
मुंबई : राज्यात मंगळवारी मुंबईसह कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागाला पावसाने जोरदार दणका दिला. ओढे, नाले, नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वाधिक फटका कोकणाला बसला. घाटांत दरडी कोसळल्याने येथील काही मार्गही ठप्प झाले आहेत.
अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले. अमरावती, तिवसा, मोर्शी व धामणगाव तालुक्यांत अतिवृष्टी झाली. तिवसा आठवडी बाजारात आलेले ४२ व्यापारी व विक्रेते पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी व आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा या गावातील सखल भागातील ११० घरांत पावसाचे पाणी शिरले. तब्बल ५४ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, ९९६ हेक्टरवरील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.
गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. खजरी-खोडशिवणी मार्गावरील पूल वाहून गेला. तर बाह्मणी-दल्ली मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गसुद्धा बंद झाला होता. चूलबंद नदी दुथडी भरून वाहत आहे. तिरोडा शहरातील काही वस्त्यांना पाण्याचा वेढा घातल्याचे चित्र होते. अकोला, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.