पावसाने उडविली दाणादाण

By Admin | Published: August 6, 2015 01:13 AM2015-08-06T01:13:15+5:302015-08-06T01:13:26+5:30

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे

Rain lashes | पावसाने उडविली दाणादाण

पावसाने उडविली दाणादाण

googlenewsNext

मुंबई : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. औरंगाबाद, नांदेड, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यात पावसामुळे दोन वृद्ध महिलांचा बुडून मृत्यू झाला. त्यात शामाबाई राजाराम महाजन (७०, रा. ऐनपूर ता. रावेर) आणि झामाबाई देवराम येशे (७५, रा. उत्राण ता. एरंडोल) यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये शहानूर नदीला आलेल्या पुरात मनोहर श्रीराम काळे (५५) वाहून गेले. अकोला जिल्ह्यात अदमपूर येथील रेशमा पंढरी भोजने (७५) ही महिला नागझिरी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये ढाणकी येथील असिम खान मोबीन खान पठाण व एका २१ वर्षीय तरुणाचा सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला.
विदर्भात धुवाधार ! : अकोला (१७९.४ मिमी), वाशिम (१६४.२ मिमी), अमरावती (१४८.८ मिमी), बुलढाणा (१४४.२ मिमी) व यवतमाळमध्ये (८६.३ मिमी) पावसाने दाणादाण उडविली.
पुराचा हाहाकार  बुलडाण्यात पूर्णा नदीला पूर ऊर्ध्व वर्धा धरणाचे १३ तर निम्न वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडले
यवतमाळचे निळोणा धरण ओव्हर फ्लो  जळगाव जिल्ह्यात १० व अमरावती जिल्ह्यात १२ गावांचा संपर्क तुटला

जळगावमधील भाटीचे धरण ओव्हर फ्लो, हतनूर धरणाचे ४१ दरवाजी उघडले
लातूर : मराठवाड्यातील पावसाचे अल्प प्रमाण पाहता विभागासाठी म्हणून कृत्रिम पावसाची कायमस्वरुपी यंत्रणा उभी करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. लातूर येथील विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश आले आहे. योगायोगाने विदर्भासह मराठवाड्यात पाऊस सुरू झाला आहे. परंतु शासनाने कृत्रिम पावसासाठीची सारी यंत्रणा लावली होती. रडार गुरुवारी येणार होते. मात्र विमानातील छोट्या रडारवर ढग पाहून आम्ही रसायनाच्या नळकांड्या फोडल्या, याला यश आले आहे.
कृत्रिम पाऊस किती पडला याची आकडेवारी लवकरच हाती येईल. कृत्रिम पावसासाठी आणखी एक विमान मराठवाड्यात येणार आहे. आता काही ठिकाणी पडलेला पाऊस हा पाच मीमी पेक्षा जास्त आहे. कृषी विभागाच्या मते पाच मीमी इतका पाऊस हा पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे म्हणत असल्याने कृत्रिम पाऊस पुरेसा आहे.

Web Title: Rain lashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.