पुढील चार दिवस पावसाचे!
By admin | Published: June 4, 2016 03:14 AM2016-06-04T03:14:31+5:302016-06-04T03:14:31+5:30
मान्सून येत्या तीन दिवसांत केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची गोड बातमी हवामानशास्त्र विभागाने दिली आहे़ पुढील चार दिवसांत विदर्भासह राज्यभरात मान्सूनपूर्व पाऊस
पुणे : मान्सून येत्या तीन दिवसांत केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची गोड बातमी हवामानशास्त्र विभागाने दिली आहे़ पुढील चार दिवसांत विदर्भासह राज्यभरात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता असून वैशाख वणव्यात पोळून निघालेल्या जनतेला त्यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि नैऋत्य व मध्य पूर्व बंगालच्या उपसागरातून मान्सूनची वाटचाल दमदारपणे सुरू आहे. सध्यातरी त्यामध्ये कोणताही अडथळा नसल्याने येत्या तीन दिवसांत मॉन्सून केरळात धडक्याची शक्यता आहे. त्यानंतर तो राज्यभरात सक्रीय होण्यास आठवडाभराचा कालावधी लागतो. परंतु त्यापूर्वी मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याने हा आठवडा चिंब करणारा असेल, असा अंदाज आहे.
गेल्या २४ तासात राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस झाला़ कोकणातील पेडणे, सावंतवाडी, वाल्पोई, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, चिपळूण, दोडामार्ग, खेड, लांजा, मालवण, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला़़ सातारा जिल्ह्यातील खटाव, वडूज,तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या दुष्काळग्रस्त भागातही पाऊस झाला.
दरम्यान विदर्भ पुन्हा तापला आहे. अनेक शहरांच्या कमाल तापमानात २ ते ४़८ अंश सेल्सिअस इतकी वाढ नोंदविली गेली़ किमान तापमानातही वाढ झाली आहे़ राज्यात शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़८ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली़ (प्रतिनिधी)
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
चंद्रपूर ४६़८, ब्रम्हपुरी ४६़६, वर्धा ४५़६, नागपूर ४५़२, गोंदिया ४४़२, अकोला ४३़६, परभणी ४३़३, जळगाव ४३़२, यवतमाळ ४३, नांदेड ४२़५, मालेगाव ४२़२, अमरावती ४०़४, औरंगाबाद व अहमदनगर ४०़२, बुलढाणा ४०, सोलापूर ३९़९, वाशिम ३९, पुणे ३८़७, नाशिक ३८़२, सातारा ३५़४, सांगली ३५़१, मुंबई ३५, पणजी ३४़६, कोल्हापूर ३४़३, डहाणु ३४़१, रत्नागिरी ३३़९, अलिबाग ३२़८ आणि महाबळेश्वर ३०़४.