परतीच्या पावसाचा तडाखा! वीज पडून पाच जण ठार, खरिपातील उभी पिके जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:10 AM2020-10-12T02:10:15+5:302020-10-12T06:56:46+5:30
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़
मुंबई/पुणे/कोल्हापूर/अकोला: खरीप पिके हाताशी आली असताना परतीच्या पावसाने तडाखा दिला. कोकणातील भातपिके तर मराठवाडा विदर्भातील सोयाबीनसारखी खरीप पिके जमीनदोस्त केली. तर वीज कोसळून मराठवाड्यातील तीन तर विदर्भातील दोघे जण मरण पावले तर आठ जण जखमी झाले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़ गेल्या २४ तासांत कोकणातील वेंगुर्ला ११०, देवगड १००, पेडणे ८०, महाड ७०, वैभववाडी ६०, रत्नागिरी ५० मिमी, तर मध्य महाराष्ट्रातील कर्जत १००, पन्हाळा ९०, खंडाळा बावडा ८०, बारामती, कोरेगाव ५० मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत शनिवारी रात्री रविवारी झालेल्या जोरदार पावसाने भाताची पिके जमीनदोस्त झाली. सोलापूरमध्ये भरपावसात शेळ्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा शॉक बसून तो ठार झाला.
मराठवाड्यात तिघांचा मृत्यू
मराठवाड्यत रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अतिवृष्टीने हैराण केलेल्या वरुणराजाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठणच्या जायकवाडी धरण व परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सोडला जात आहे. माजलगाव प्रकल्पातून पाणी सोडले आहे.