श्रावणासंगे पाऊसधारा, मुंबई, कोकणासह कोल्हापूरला पाऊस बरसला; गडचिरोलीत अतिवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:40 AM2018-08-13T06:40:02+5:302018-08-13T06:40:29+5:30
श्रावणाच्या आरंभाबरोबरच राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस परतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबई-कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाऊस झाला.
मुंबई : श्रावणाच्या आरंभाबरोबरच राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस परतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबई-कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.
पुढील २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ मराठवाड्यात मात्र पुरेसा पाऊस झालेला नसून, औरंगाबादसह काही जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १६००, ‘वारणा’मधून ४,३७३ तर दूधगंगेतून २,५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात ५० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात सुमारे ९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. आलापल्ली-भामरागड व बामणी टेकडा ताला मार्ग बंद झाल्याने शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर अनेक ठिकाणी शनिवारपासून भिज पावसाला सुरुवात झाली़ किनवट मंडळात अतिवृष्टी, तर बिलोली तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे़ पुढील तीन दिवसांत मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मोठा पाऊस होण्यासाठी मात्र अनुकूल परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही़