लोणावळा परिसरात पावसाची रिपरिप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 08:29 AM2018-03-16T08:29:55+5:302018-03-16T08:45:09+5:30

शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची आणि लोकांची तारांबळ उडाली आहे.

rain started in Lonavala may affected crops | लोणावळा परिसरात पावसाची रिपरिप

लोणावळा परिसरात पावसाची रिपरिप

Next

लोणावळा : दोन दिवसांपासून ढगाळलेल्या वातावरणानंतर शुक्रवारी पहाटेपासून लोणावळा परिसरात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ झाले असून ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी बरसायला लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात लोणावळ्यातील तापमानाचा पारा 34 ते 35 अंशापर्यंत पोहोचला होता. मात्र, पावसामुळे तापमान अचानक कमी झाल्याने दिवसादेखील थंडी वाजायला लागली आहे. 

आजदेखील सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची आणि लोकांची तारांबळ उडाली आहे. तत्पूर्वी गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्याचे दर्शनही झाले नव्हते. आजदेखील पाऊस पडायला सुरू झाल्याने तिच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यास शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, पावसामुळे विटभट्टीधारकांचे देखिल नुकसान होणार आहे. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा  निर्माण झाला असून उत्तर मध्य-महाराष्ट्रावराही चक्रवाती परिस्थिती कार्यरत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि कोकण तसंच गोवा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ राहील. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे, ज्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या काळात मुंबईत देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: rain started in Lonavala may affected crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.