पाऊस अजून ढगातच!
By admin | Published: June 20, 2017 01:27 AM2017-06-20T01:27:33+5:302017-06-20T01:27:33+5:30
हवामान खात्याने वर्तविलेले ‘मुसळधारे’चे सर्व अंदाज साफ धुडकावून लावत गेल्या दोन दिवसापासून पावसाने ढगात दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हवामान खात्याने वर्तविलेले ‘मुसळधारे’चे सर्व अंदाज साफ धुडकावून लावत गेल्या दोन दिवसापासून पावसाने ढगात दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. आजवरची आकडेवारी पाहिली तर काही ठिकाणी पाऊस तत्वत:च हजेरी लावून गेल्याचे दिसून येते.
राज्यात काही ठिकाणी बरसलेल्या पावसाने सरासरी ओलांडली असल्याचे चित्र कागदावर दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोकण, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता इतरत्र पावसाने पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. आत्तापर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाडा वगळता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी दिसून येत आहे. काही ठिकाणी सात दिवसांची देखील ओढ दिसून येत आहे. पारंपरिक दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे.
पुणे वेधशाळेचे अधिकारी अरविंद श्रीवास्तव म्हणाले, मान्सूनच्या वाटचालीत कधीही सलगता नसते. कधी अनुकूल आणि प्रलिकूल परिस्थिती उद्भवते. त्यावरच त्याची वाटचाल अवलंबून असते. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्याने प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. येत्या दोन दिवसांत या स्थितीत बदल होऊन मान्सून पुन्हा सक्रीय होईल. येत्या दोन ते ३ दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होईल. तर, २५ ते २७ जून दरम्यान संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होईल, असे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले. राज्यातील अनेक भागांत पावसाने आठवड्यापेक्षा जास्त ओढ दिली आहे. तेथील पिकांवर काहीसा परिणाम होऊ शकतो, असेही साबळे यांनी स्पष्ट केले.