राज्यभर बरसात

By admin | Published: October 4, 2015 04:30 AM2015-10-04T04:30:49+5:302015-10-04T04:30:49+5:30

विजांच्या कडकडाटासह शनिवारी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, नाशिक, पुणे, नगर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनांत राज्यात

Rain throughout the state | राज्यभर बरसात

राज्यभर बरसात

Next

मुंबई : विजांच्या कडकडाटासह शनिवारी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, नाशिक, पुणे, नगर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस झाला. वीज पडून झालेल्या दुर्घटनांत राज्यात तब्बल २६ जणांना जीव गमवावा लागला. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
वीज पडून मराठवाड्यात सर्वाधिक १३ जणांचा बळी गेला. त्यात परभणी (४), औरंगाबाद (४), जालना (२), उस्मानाबाद (२), लातूर (१) जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. विदर्भात नागपूर (४), यवतमाळ (३), वर्धा (१) येथे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये २ तर नगरमध्ये जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील एका मंदिरावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
मुंबई व ठाणे जिल्ह्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासांत जिल्ह्यात १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारीही पावसाचा जोर कायम होता. गेल्या २४ तासांत खडकवासला धरण साखळीतील चारही प्रकल्पांत तब्बल १४२ मिलिमीटर पाऊस झाला. सातारा, रत्नागिरी जिल्ह्यात वीज पडून काही घरांचे नुकसान झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

हवेच्या चक्राकार स्थितीमुळे पाऊस
नैर्ऋ त्य मोसमी पावसाने (मान्सून) देशातून परतीचा प्रवास सुरू केला असला तरी अजूनही तो उत्तर भारतातच आहे. त्यामुळे देशाच्या मध्य, दक्षिण, ईशान्य व पूर्व भागांमध्ये मान्सूनचा पाऊस अधूनमधून पडत आहे. बंगालच्या उपसागरात हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे.

बिहारमधून मान्सून माघारी
राजस्थान, पंजाबमध्ये ठाण मांडून बसलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी आगेकूच केली आणि तो बिहारच्या बहुतांश भागातून माघारी गेला. त्याचबरोबर उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगडच्या काही भागातून मान्सून माघारी गेल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले.

Web Title: Rain throughout the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.