Rain Update: परतीच्या पावसाने सोलापुरात हाहाकार; सोलापुरात अनेक ठिकाणी पूरस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 04:03 AM2020-10-15T04:03:59+5:302020-10-15T04:04:12+5:30
बार्शी शहर जलमय, शेकडो घरांचे नुकसान
सोलापूर/लातूर : परतीच्या पावसाने बुधवारी सोलापूरला जोरदार तडाखा. विजांच्या कडकडाटसह झालेल्या मुसळधार पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता, की काही तासांतच जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर लावलेली चारचाकी, दुचाकी वाहने पुरात वाहून गेली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, शेकडो हेक्टरवरील पिकांचेही मोठे नुकसान झाले. बार्शीतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने शहर जलमय झाल्यासारखे चित्र पहायला मिळाले.
पावसामुळे भीमा, सीना, भोगावती, हरणा, बोरी, अफ्रुका, नीलकंठा नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला. बार्शीहून मराठवाड्याकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत. शिवाय बार्शी- सोलापूर, अक्कलकोट- गाणगापूर मार्गही बंद झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या सीना-कोळेगाव धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्याने बुधवारी चार तर निम्न तेरणा प्रकल्पाचे चौदा दरवाजे उघडले असून सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लातूरमध्येही अतिवृष्टी लातूर जिल्ह्यातील निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर आणि उदगीर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे़