Rain Update: राज्यभरात आठवडाभर मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:17 AM2020-10-12T02:17:12+5:302020-10-12T06:57:21+5:30
१३ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागांत बहुतांश ठिकाणी पाऊस सक्रिय झाला असून, १२ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत म्हणजे सुमारे आठवडाभर राज्यात कोकणासह आतील भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
१२ ऑक्टोबरपासून सहा दिवस विजांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहतील. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सक्रिय राहील. १२ ऑक्टोबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़
१३ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १४ व १५ ऑक्टोबरला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे़