Rain Update: राज्यावर आभाळ कोसळले, चौदा जणांचा बळी, खरीप पिके मातीमोल; सैन्यदले ‘हाय अलर्ट’वर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 07:06 IST2020-10-16T03:12:12+5:302020-10-16T07:06:37+5:30
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश, वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Rain Update: राज्यावर आभाळ कोसळले, चौदा जणांचा बळी, खरीप पिके मातीमोल; सैन्यदले ‘हाय अलर्ट’वर!
पुणे/मुंबई : परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. पुणे जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने चौघे मरण पावले. सोलापुरात १४ जणांचा बळी गेला. मनुष्यहानी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले.
उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. प्राथमिक अंदाजानुसार २३ जिल्ह्यांमधील काढणीवर आलेल्या साडेचार लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तूर, भात यांच्यासह कापसाचेही नुकसान झाले आहे.
सोलापूर : ३ दिवसांत १४ मृत्यू
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात ३ दिवसात १४ जणांचा मृत्यू झाला. ३५०हून अधिक जनावरे दगावली आहेत. ५६५ गावे बाधीत झाली असून ४७३१ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.
कोल्हापूर : पिकांची धूळधाण
कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाने काढणीस आलेल्या पिकांची धुळधाण उडाली आहे. सुमारे २३५० हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहेत
सांगली : सर्वत्र अतिवृष्टी
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे शंभर गावांतील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. कृष्णेला पूर आला आहे.
उस्मानाबाद : १३० जणांची सुटका
पुरात सुमारे १३० जण अडकून पडले होते़ एनडीआरएफच्या मदतीने त्यांची सुटका केली.