Rain Update: कोकणात रेड अलर्ट, सोलापुरात पूरस्थिती; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 03:02 AM2020-10-15T03:02:18+5:302020-10-15T06:45:43+5:30
पंढरपुरात घाटाची भिंत कोसळून सहा ठार, १८ ऑक्टोबर रोजी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे
सोलापूर/मुंबई/कोल्हापूर : संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. सोलापूर, लातूर आणि उस्मानाबादमध्ये ढगफुटीसारखा धो-धो पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पंढरपुरात घाटाची भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, तर सिंधुदुर्गमध्ये एक महिला वाहून गेली. गुरुवारी संपूर्ण कोकणला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पंढरपुरात चंद्रभागा नदीकाठावर कुंभारघाटाजवळ नव्या घाटाचे काम सुरू आहे. येथे लोकांनी झोपड्या बांधल्या होत्या. घाटाची २० फूट भिंत कोसळल्याने गोपाळ अभंगराव, राधाबाई अभंगराव, मंगेश अभंगराव, संग्राम जगताप (१२) यांच्यासह अन्य दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई, ठाणे, रायगडला आज अति मुसळधारेचा इशारा
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गुरुवारी अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक होता. सोलापूर, सातारा आणि सांगलीत जोरदार पाऊस झाला आहे. पुढील १२ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट आहे. वाºयाचा वेग ताशी ४० किमी आहे. मुंबई, ठाणे, पालघरला यलो अलर्ट आहे. येथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले.
पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू
परतीच्या पावसाने कोकणातही संततधार कायम ठेवली आहे. त्यामुळे कापणीला आलेली भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने भातपीक धोक्यात आले आहे. कोंडये तेलीवाडी (ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) येथील मयूरी मंगेश तेली (३५) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली.
पावसाळा लांबणार, २० ऑक्टोबरपर्यंत पाऊस
अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार असल्याने राज्यात ऑगस्टमध्ये पडतो, तसा सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबर रोजी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. २० ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.