कोकणासह मध्य महाराष्ट्राला आज पावसाचा इशारा, मुंबई ढगाळ राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 05:01 AM2019-12-04T05:01:03+5:302019-12-04T05:05:02+5:30
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘पवन’ नावाचे चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने पुढे सरकत असले तरी याचा परिणाम म्हणून ४ डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ४ आणि ५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, बुधवार, ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी सोसाट्याचा वारा वाहील. समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर १४.२
महाबळेश्वर १५
उस्मानाबाद १६
औरंगाबाद १६.४
अकोला १६.७
अमरावती १६.६
गोंदिया १५.५
वाशिम १६
यवतमाळ १६.४