राज्यात पावसाचा इशारा
By admin | Published: May 3, 2015 05:01 AM2015-05-03T05:01:51+5:302015-05-03T05:01:51+5:30
हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस कोकण, गोव्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील,
मुंबई : हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस कोकण, गोव्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील, असा इशारा भारतीय हवामानशास्र विभागाने वर्तविला आहे.
मागील चोवीस तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले असून कोकण, गोवा, मध्य
महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
३ मे रोजी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ४ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. ५ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील. ६ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील. (प्रतिनिधी)