पावसाने प्रचारावर पाणी
By admin | Published: May 14, 2017 02:40 AM2017-05-14T02:40:53+5:302017-05-14T02:40:53+5:30
वळवाच्या पावसाने तात्पुरता सुखद दिलासा दिला असला तरी त्याने भिवंडीतील उमेदवारांच्या प्रचाराचे गणित मात्र बिघडवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : वळवाच्या पावसाने तात्पुरता सुखद दिलासा दिला असला तरी त्याने भिवंडीतील उमेदवारांच्या प्रचाराचे गणित मात्र बिघडवले. अर्ज माघारीनंतर प्रचारासाठी दहा दिवस मिळतील हे गृहीत धरून शुक्रवारपासून घरोघर प्रचाराचे नियोजन उमेदवारांनी केले होते. मात्र वळवाच्या पावसाने ते बिघडवले.
बॅनर, झेंडे, भित्तीपत्रके असे साहित्य भिजल्याने ते पुन्हा गोळा करण्याची तयारी त्यांना करावी लागली. त्यातच शनिवारी सकाळीही पाऊस पडल्याने अनेकांच्या प्रचारातील दीड दिवस वाया गेला. रस्त्यांत, पक्ष कार्यालयांच्या आणि उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांच्या परिसरात पाणी साचून चिखल झाल्याने त्यातून वाट काढणे कठीण बनले. साचलेला कचरा, रस्त्याशेजारी माती भिजून त्यातही चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अशा स्थितीत प्रचाराला गेल्यावर प्रथम शहराच्या या अवस्थेला उमेदवारांना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे ते हैराण झाले आहेत.
पॅनेलसाठी अपक्षांना गळ
ज्या बंडखोरांनी, पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत, त्यांना आतापासूनच गळाला लावण्याचे प्रयत्न वेगवेगळ््या पक्षांनी सुरू केले आहेत. त्यात भाजपा आणि शिवसेना आघाडीवर आहेत.
भाजपाचे अधिकृत उमेदवार ५८ असले तरी त्यांचे नेते मात्र ७० जण रिंगणात असल्याचे सांगताना गळाला लावलेल्या अपक्षांचाच आधार घेत आहेत. त्याचपद्धतीने शिवसेनेनेही अशाच सहा ते सात नाराजांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. जेथे राजकीय पक्षांना पॅनेलमधील चारही उमेदवार उभे करता आलेले नाहीत, तेथे एका अपक्षाचा आधार घेत चार उमेदवारांचे गणित पूर्ण केले जात आहे. यातून प्रतिस्पर्धी कमी करणे आणि निवडणुकीनंतरच्या गणितांसाठी संख्याबळ वाढवण्याचाही पक्षांचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्र्यांची सभा, आदित्य ठाकरेंचाही रोड शो
प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात १९ तारखेच्या शुक्रवारपासून नेत्यांच्या सभांची धुळवड रंगेल. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या दिग्गज नेत्यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ मे रोजी येणार आहेत. पण ते फक्त आपल्याच पक्षाचा प्रचार करतील, अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली. कोणार्क आघाडीशी केलेला समझोता अधिकृत मानण्यास नेते तयार नसल्याने मुख्यमंत्र्यांची सभा फक्त भाजपा उमेदवारांसाठी होईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेणार की नाहीत, हे अद्याप ठरलेले नाही. मात्र युवा नेते आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार हे स्पष्ट झाले. फक्त त्याची तारीख ठरलेली नाही.
काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि या निवडणुकीची जबाबदारी असलेले ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसेन यांच्या सभा होतील. तर राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांनाच आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याखेरीज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभा होतील. समाजवादी पक्षातर्फे अबू आझमी हेच प्रचाराची धुरा सांभाळतील, तर मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे प्रचाराला येण्याची शक्यता नाही. एमआयएमची पहिली सभा यशस्वी न ठरल्याने ओवेसी बंधूंपैकी कोणी येण्याची शक्यता नाही.
सोशल मीडियाचा आधार : चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने आणि प्रत्यक्ष प्रचाराचा आठ दिवसांचा काळ हाती असल्याने सोशल मीडियातून प्रचारावर प्रत्येक उमेदवाराचा भर आहे फेसबुकवर प्रचाराच्या क्लिप, फोटो, आधीच्या कामांचा तपशील टाकणे, व्हॉटस अॅपवरून प्रचार, एसएमएस, व्हॉइस मेसेजवर उमेदवारंचा भर आहे. त्यासाठी प्रचार कार्यालयांतच सोशल मीडिया सेल स्थापन झाले आहेत. तेथूनच प्रचारानंतर लगेचच मजकूर, माहिती, फोटो अपलोड केले जात आहेत. सुट्टीच्या काळात काम मिळाल्याने तरूण मुलेही या कामातून कमाईकडे वळली आहेत. तसेच मतदान केंद्राची माहिती तोंडी सांगण्यापेक्षा काही उमेदवारांनी विविध भागातील मतदारांच्या केंद्रासह माहितीचे बॅनर आपल्या कार्यालयांत लावले आहेत.
>भिवंडीत सापडले नऊ लाख
भिवंडी : महापालिका निवडणुकीच्यानिमित्ताने वाहनांची तपासणी केली जात आहे. भरारी पथकाने शनिवारी सकाळी तपासलेल्या चार वाहनांमध्ये नऊ लाख रोखरक्कम आढळली. चार व्यापाऱ्यांच्या गाड्यांमधून ही रक्कम होती. यंत्रमाग कामगारांना १० ते १५ व २५ ते ३० तारखे दरम्यान पगार दिला जातो. त्यासाठी व्यापारी रक्कम कारखान्यात घेऊन येतात.
महानगरपालिका निवडणूक कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार ९० जागांसाठी ४६० उमेदवार आता रिंगणात उरले आहेत. यात छोट्या पक्षांसह अपक्षांची संख्या १८१ आहे. कोणार्क विकास आघाडी २४ जागांवर लढणार होती. मात्र त्यांचे अधिकृत उमेदवार १६ असल्याचे यादीतून स्पष्ट झाले.