पाऊस रडवूनच परतणार; राज्यात दोन दिवसांपासून तडाखा; सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 06:09 AM2022-10-08T06:09:50+5:302022-10-08T06:10:20+5:30

यंदा अतिवृष्टी, संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

rain will crackdown in the state for two days damage to soybean cotton tur crop | पाऊस रडवूनच परतणार; राज्यात दोन दिवसांपासून तडाखा; सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान

पाऊस रडवूनच परतणार; राज्यात दोन दिवसांपासून तडाखा; सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला / अहमदनगर / उस्मानाबाद /मुंबई: यंदा अतिवृष्टी, संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उरलेसुरले पीक शेतात असताना गेले दोन दिवस राज्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाने तडाखा दिला असून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती आहे.

अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. सोंगणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला पाण्याचा वेढा पडला. वाशिम जिल्ह्यातील दापुरा आणि चौसाळा, म्हसनीनजीकच्या नाल्याला पूर आल्याने त्या गावांचा संपर्क तुटला.  

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि परिसरात गुरुवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तळेगाव व पाटणादेवी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने डोंगरी व तितूर नद्यांना पूर आला. भडगाव तालुक्यात शेतांमध्ये पाणी साचले. शिरसगावात पुराचे पाणी शिरले. पावसामुळे कपाशी पीक खराब होत आहे, तर कापणीला आलेली मका, ज्वारी व बाजरीची पिकेही नष्ट होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पिके पुन्हा पाण्यात गेली आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. माजलगाव धरण शुक्रवारी पहाटे ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या एका दरवाजातून सकाळी ४०६ क्युसेकने पाणी सिंदफना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. 

अतिवृष्टीने पिकांची नासाडी 

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा व जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. दोन्ही तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या नद्या - नाल्यांना पूर आला, तर जामखेड तालुक्यात पूल वाहून गेला. नेवासा तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. नंदुरबार तालुक्यात वेचणीवर आलेला कापूस आणि मिरचीचे नुकसान झाले आहे. कापूस ओला झाला तर लाल मिरचीची प्रतवारी खराब होणार आहे.

चार-पाच दिवस धिंगाणा

पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यभरात सर्वत्र गडगडाटासह पाऊस पडेल आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

८ ऑक्टोबर : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. 
९ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल. 
१० ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, प. महाराष्ट्र आणि उ. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस पडेल. 
११ ऑक्टोबर : मुंबई, म. महाराष्ट्रासह विदर्भात जाेरदार पाऊस पडेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: rain will crackdown in the state for two days damage to soybean cotton tur crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.