पावसाचे ‘फटाके’ दिवाळीपर्यंत फुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 09:26 AM2022-10-17T09:26:25+5:302022-10-17T09:27:06+5:30
आज, उद्या मुंबई परिसराला झोडपून काढण्याची शक्यता
मुंबई : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यात बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाचा मारा सुरू असून, पुढील तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तर विदर्भात येत्या २४ तासांत गडगडाटाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राज्यात अनुकूल हवामान आहे. त्यानुसार छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या आणखी काही भागातून मान्सून पुढील दोन दिवसांत माघारी जाईल. दरम्यानच्या काळात या राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कधी, कुठे आणि कसा?
१७ आणि १८ ऑक्टोबर : कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात पाऊस होईल. मुंबई परिसरातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
१९ ऑक्टोबर : औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.