राज्यभरात पावसाचे ११ बळी
By admin | Published: June 4, 2017 01:13 AM2017-06-04T01:13:32+5:302017-06-04T01:13:32+5:30
राज्यात दोन दिवसांत पावसाचे ११ बळी गेले असून त्यापैकी चौघे मराठवाड्यातील आहेत. नाशिक आणि पश्चिम वऱ्हाडात प्रत्येकी तिघांचा व नंदुरबारला
- लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक/ नांदेड/ बुलडाणा / नंदुरबार : राज्यात दोन दिवसांत पावसाचे ११ बळी गेले असून त्यापैकी चौघे मराठवाड्यातील आहेत. नाशिक आणि पश्चिम वऱ्हाडात प्रत्येकी तिघांचा व नंदुरबारला एकाचा मृत्यू झाला. शनिवारी नाशिकला पावसाने झोडपून काढले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तेथे ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे तब्बल एक तास विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला़ टोकडे येथे समाधान बहाद्दुरसिंग सुमराव (३०), सुनंदा दिनकर गायकवाड (३२) अशी मृतांची नावे आहेत. इगतपुरीतील रायगडनगरमध्ये विठू कमळू उघडे (२५) याचा वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यातील ईकळीमाळ (ता़ नायगाव) येथे शनिवारी दुपारी शेतात काम करीत असताना वीज पडून गंगाराम (२५) आणि शिवाजी गोंविद मृदंगे (२०) या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला़
उदगीर (जि. लातूर) तालुक्यातील मोघा शिवारात वीज पडून पांडुरंग एकनाथ काळोजी (६५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ते शेतात नांगरणीचे काम पाहत थांबले होते़ जालना जिल्ह्यात शेतात काम करता असताना अंगावर वीज कोसळून राघो गौणाजी धनवई (६५) हे ठार झाले.
वाशिम जिल्ह्यातील भर जहाँगीर येथे वेळूच्या झाडाची कटाई करण्यासाठी आलेल्या विजय गरकळ (१६) व संतोष गरकळ (३०) या मजुरांचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात मशागतीसाठी गेलेल्या सुरेश महादू काळे यांचा (४०) वीज कोसळून मृत्यू झाला.
नंदुरबारच्या सैताणे येथे शुक्रवारी अंगावर वीज पडून जामसिंग रामसिंग भिल (६०) यांचा मृत्यू झाला.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा
पुणे : अजूनही केरळमध्येच मुक्काम ठोकून असलेला मॉन्सून येत्या २४ तासांत अरबी समुद्राचा आणखी काही भाग, दक्षिण कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी, रायलसिमा आणि तमिळनाडूच्या काही भागात प्रगती करण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे़ येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़
मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़
६ जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी आणि ७ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़