बांधकाम परवान्यांसाठी लातुरात अर्जांचा पाऊस
By admin | Published: October 22, 2016 11:19 PM2016-10-22T23:19:26+5:302016-10-22T23:19:26+5:30
दुष्काळामुळे तब्बल तीन वर्षांपासून घरबांधणीचे स्वप्न अपुरे राहिलेल्या लातूरकरांनी यंदा पावसाने कृपादृष्टी केल्याने बांधकाम परवान्यांसाठी अर्जांचा पाऊस पाडला आहे.
लातूर : दुष्काळामुळे तब्बल तीन वर्षांपासून घरबांधणीचे स्वप्न अपुरे राहिलेल्या लातूरकरांनी यंदा पावसाने कृपादृष्टी केल्याने बांधकाम परवान्यांसाठी अर्जांचा पाऊस पाडला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात बांधकामाच्या परवान्यांना स्थगिती होती़ यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे महापालिकेने बांधकाम परवान्यांना मंजुरी देण्यास सुरुवात केली. १ सप्टेंबर ते २२ आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत बांधकामासाठी ५०७ अर्ज आले असून, त्यापैकी ४३० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे़
दुष्काळामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प कोरडेठाक पडले होते़ नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम परवान्यांना बंदी केली होती़ परिणामी, तीन वर्षांपासून बांधकामे रखडली होती़ यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा १२ मिमी़ अधिक पाऊस झाला. त्यामुळे सर्व मोठे, मध्यम व लघु प्रकल्प तुडूंब भरले. शहरातील पुनर्भरण केलेले बोअरही भरले आहेत. पाच नंबर चौक ते शासकीय दवाखान्यापर्यंतच्या समांतर रस्त्यावर बांधकामे सुरू झाली आहेत़ सुशिलादेवी नगर, रिंग रोड, आदर्श कॉलनी, विवेकानंद चौक, रेणापूर नाका भागातील बांधकामांना गती आली आहे़ (प्रतिनिधी)
परवान्याचेही नियम शिथिल
पाणीटंचाईमुळे तीन वर्षांपासून बांधकामांसाठी किचकट नियम होते़ पावसामुळे आता सरसकट परवाने देण्याचे प्रक्रिया सुरू केली आहे़ मालकी हक्काचा उतारा, अर्ज व जागेचा नकाशा या तीनच कागदपत्रासह लागणाऱ्या कामगार उपकराला प्राधान्य देण्यात आले आहे. - सुनील देशपांडे, नगर रचनाकार, महापालिका