वृक्षारोपण मोहिमेला पावसाचा ‘ब्रेक’

By Admin | Published: August 4, 2014 12:17 AM2014-08-04T00:17:03+5:302014-08-04T00:17:03+5:30

शतकोटी वृक्ष लागवड मोहिम रखडली

Rainfall 'brake' for plantation campaign | वृक्षारोपण मोहिमेला पावसाचा ‘ब्रेक’

वृक्षारोपण मोहिमेला पावसाचा ‘ब्रेक’

googlenewsNext

वाशिम: पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांमध्ये शतकोटी वृक्ष लागवड मोहिम पावसाच्या लहरीपणाची शिकार ठरत आहे. पाऊस लांबल्याने वृक्ष लागवड मोहिमेलाही ब्रेक लागले आहेत.
वनसंपदेवर मानवी कुर्‍हाड कोसळल्याने निसर्गचक्राचे ताळतंत्र बिघडत असल्याचा अनुभव सजीवसृष्टी पदोपदी घेत आहे. गरजांची पूर्तता आणि भौतिक सुख-संपन्नतेसाठी निसर्गावर विजय मिळविण्याच्या मानवी प्रयत्नांनी भूतलावरील स्वत:च्या अस्तित्वालाच धोका निर्माण केल्याची साक्ष पर्यावरणाचा असमतोलपणा देत आहे. या पृष्ठभूमीवर पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याचा प्रयत्न म्हणून, शतकोटी वृक्ष लागवड मोहिम राज्य शासनाने सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत २0१४-१५ या वर्षात वाशिम जिल्ह्यास ११ लाख आठ हजार, अकोला जिल्ह्यास १७ लाख तर बुलडाणा जिल्ह्यास जवळपास १५.५0 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी उन्हाळ्याच्या अखेरीस वृक्षारोपणासाठी खड्डेही खोदून ठेवण्यात आले होते. साधारणत: जून महिन्यामध्ये पाऊस आल्यानंतर वृक्ष लागवड मोहिम सुरू होण्याची अपेक्षा असते; मात्र यावर्षी मृग नक्षत्र कोरडे गेले. जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता, शतकोटी वृक्ष लागवड मोहिम जागेवरच थांबली आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने वृक्ष लागवड करण्याची जोखीम उचलली जात नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

** वाशिम जिल्ह्यातील वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

वनविभाग व ग्रामीण विकास यंत्रणेला २0१४-१५ या वर्षात प्रत्येकी चार लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
सामाजिक वनीकरण विभाग एक लाख तर कृषी विभागाला एक लाख ८ हजाराचे उद्दिष्ट आहे.
वाशिम तालुका एक लाख ९५ हजार, मालेगाव तालुका एक लाख ९0 हजार, रिसोड तालुका एक लाख ९४ हजार ५00, मंगरुळपीर तालुका एक लाख ९४ हजार ५00, कारंजा तालुका एक लाख ९0 हजार ५00 तर मानोरा तालुका एक लाख ४३ हजार ५00 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Web Title: Rainfall 'brake' for plantation campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.