पावसाने जनजीवन विस्कळीत
By admin | Published: August 4, 2016 01:02 AM2016-08-04T01:02:04+5:302016-08-04T01:02:04+5:30
खेड तालुक्यात दोन दिवसांपासून चालू असलेली संततधार आजही सुरु राहिली.
राजगुरुनगर : खेड तालुक्यात दोन दिवसांपासून चालू असलेली संततधार आजही सुरु राहिली. चासकमान धरणाचे पाणी सोडल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली. भात आणि इतर खरीप पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे, मात्र काही ठिकाणी शेतात पाणी वाढल्याने पिके वाहून जाण्याच्या घटना घडल्या.
चासकमान धरणातून भीमा नदीत ९००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती चासकमानच्या सहायक अभियंता एस. जी. शहापुरे यांनी दिली. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चासकमानच्या पाणलोट क्षेत्रात पश्चिम भागात; विशेषत: डेहणे आणि कुडे खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. तसेच कळमोडी धरण भरून वाहत असल्याने त्या बाजूनेही धरणात चांगले पाणी येत आहे. त्यामुळे भीमेला मोठा पूर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज दिवसभर तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस पडला. पूर्व पट्ट्यात पावसाचा जोर कमी होता. पण दिवसभर सरी येत होत्या. पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर कायम आहे. पश्चिम भागात खाचरे तुडुंब झाली आहेत. वाडा भागात सोयाबीनचे पीक वाहून जाण्याच्या घटना घडल्या.
ओढ्या-नाल्यांना पूर आले आहेत. गुंडाळवाडी पुलावरून पाणी वाहत होते. वेळ नदीला पूर आल्याने वाफगावाच्या पुलावरून पाणी गेले.
>भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणभागात एका दिवसात २२४ तर भाटघर धरणभागात १९२ मिलिमीटर इतका धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ओढे, नाले भरून वाहत असून, नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. महाड-पंढरपूर रोडवर हिर्डोशी येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हातवे बु. येथील गुंजवणी नदीवरील पूल काही काळ पाण्याखाली गेल्याने व भोर-शिरवळ रोडवर विंग गावाजवळ वडाचे झाड रोडवर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रायरेश्वर किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांवर डोंगरातील दरड कोसळल्याने गडावर जाण्याची वाट बंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे भुतोंडे खोऱ्यातील करुंजी, मळे, महादेववाडी, अंगसुळे, पऱ्हर, निवंगण, गुढेसह अनेक गावातील भातशेताच्या ताली पडून शेतकऱ्यांचे तालीसह भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी कुरुंजीचे उपसरपंच माऊली नलावडे व निवंगणचे सरपंच किसन दिघे यांनी केली आहे.
>गुंजवणी-चापटे धरण भरल्याने धरणाचे पाणी कालपासून गुंजवणी नदीत सोडल्याने हातवे बु. येथील नदीवरील सकाळी पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत होती. रायरेश्वर किल्ल्यावर जाणारी सिमेंटच्या पायऱ्यांच्या वाटेवर कड्यातील दरड कोसळल्याने सकाळपासून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग बंद आहे.
दुसऱ्या बाजूला दरी असल्याने जाता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दरडी हटविण्याची मागणी किल्ल्यावरील
जंगम लोकांनी केली आहे. भोर-शिरवळ रस्त्यावर विंग गावाजवळ झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील श्रीपतीनगर येथील घरांमध्ये पावसाचे
पाणी शिरल्याने नुकसान झाले.
>शाळा पाण्यात
भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर धरण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कंकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत पाण्यात गेली. त्यामुळे शालेय पोषण आहार, ६ संगणक संच, ई-लर्निंग साहित्य, शैक्षणिक सहित्य, पायाभूत चाचणी पेपर, कपाटांचे मोठे नुकसान झाले आहे.
सायंकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, शिक्षणाधिकारी मुश्ताख शेख यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली़ झालेल्या नुकसानाबाबत मदत करण्याची तयारी दर्शवली असून उद्यापासून शाळा पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत़
भोरपासून २५ किलोमीटरवर रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी कंकवाडी गाव असून, येथील जिल्हा परिषदेची १ ते ८ वीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. ७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेशेजारचा वाहाळेचे पाणी रात्रीभर शाळेत घुसले. १२ ते १३ फूट पाणी भरले होते. त्यामुळे शाळेतील ४०० किलो तांदूळ, तेल, डाळ हे धान्य; तर संगणक, ई-लर्निंग साहित्य, शैक्षणिक साहित्य आणि वर्ग सजावट खराब झाली आहे. सध्या वर्गात अधिक पाणी असल्याने आत जाता येत नाही. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वर्गखोल्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व साहित्य पुन्हा मिळवावे लागणार असल्याचे मुख्याध्यापक जाधव यांनी सांगितले. भिंत असती, तर कदाचित शाळा पाण्यात गेली नसती. त्यामुळे संरक्षक भिंत मंजूर करण्याची मागणी माजी सरपंच बापू कंक व शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजी कंक, सरपंच तान्हूबाई कंक यांनी केली आहे. दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, गटशिक्षणाधिकारी नाईकडे यांनी कंकवाडी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. (वार्ताहर)
>अनेक शाळा बंद
नीरा देवघर व भाटघर धरण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी आल्याने शिक्षकांना शाळेवर जाता येत नसल्याने अनेक प्राथमिक शाळा बंद राहिल्या आहेत. याचा फायदा घेत काही शिक्षकांनीच चार दिवस शाळा बंद ठेवण्याचा स्वयंम घोषित निर्णय घेतल्याची चर्चा तालुकाभर होती.
>वेल्हे तालुका : शेतीचे नुकसान; गावांचा संपर्क तुटला
मार्गासनी : वेल्हे तालुक्यात पावसाचा जोर कायम असून चोवीस तासांत २१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी रस्ते खचले आहेत व पानशेत-वेल्हे-कादवे खिंडीच्या परिसरात घाटात दरडी कोसळल्याने हा मार्ग बंद पडला आहे. शेतीसंदर्भात तलाठी व मंडल अधिकारी, तसेच कृषी विभाग यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार डॉ. वनश्री लाभसेटवार यांनी दिली.
गेल्या चोवीस तासांत वेल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. गुंजवणी धरण शंभर टक्के भरले असून गुंजवणी (कानंदी) नदीला पूर आला आहे. या नदीवरील साखर मार्गासनी पूल पाण्याखाली गेला असल्याने गुंजवणे, साखर, मेरावणे, वाजेघर गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलावरून या गावाकडे रस्ता जातो. या परिसरातील जनजीवन विस्कळित झाले असून विद्यार्थी व कामगार यांचे हाल झाले. हा पूल दरवर्षी पाण्याखाली जात असून गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल मोठा करण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वेल्हे-पानशेत-कादवे खिंडीत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने या घाटामध्ये रस्त्यावर माती वाहून आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली आहेत. त्यामुळे हा मार्ग बंद पडला आहे. वेल्हे-अंबवणे रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या नवीनच केलेल्या मोऱ्यांमधील माती व रस्ता खचला आहे. अनेक जोडरस्त्याची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी भातखाचरांचे बांध फुटले आहेत. त्यामुळे भातपिके वाहून गेली आहेत. खाचरांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील शाळांवर पावसाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून काही गावांचा संपर्क तुटल्याने झाल्याने शिक्षक शाळेत पोहोचले नाहीत,
तर काही शिक्षक उशिरा शाळेत गेले असून विद्यार्थीच शाळामध्ये आले नसल्याने शाळा बंद होत्या.(वार्ताहर)
>पानशेत - घोल मार्गावर मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग बंद आहे. या मार्गावरील दरडीमुळे आलेले दगड, माती बाजूला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू असल्याची माहिती सार्वजनिक विभागाचे उपअभियंता आर. एल. ठाणगे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. देशपांडे, तसेच शाखा अभियंता एस. व्ही. राठोड, ए. एल. जमाले यांनी मार्गासनी गुंजवणे मार्गावरील साखर पुलाची पाहणी केली. भाजपाचे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांनी कादवे खिंडीत जाऊन परिसराची पाहणी केली.
गेल्या चोवीस तासांत पानशेत येथे २०७, अंबवणे येथे १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास अंबवणे येथील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य मार्ग क्रमांक ६५ वेल्हे-चेलाडी रोड बंद पडण्याची शक्यता आहे.