विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान शास्त्र विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 04:02 AM2019-08-22T04:02:58+5:302019-08-22T04:05:02+5:30
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई : आगामी काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. तर गुरुवारी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम सरींची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे. दुसरीकडे मुंबईत पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असून, गुरुवारसह शुक्रवारी येथे हलक्या सरींची शक्यता आहे.
स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात ब-याच भागांत सामान्य किंवा जास्त पाऊस झाला आहे. तथापि, मराठवाड्यात अजूनही २४ टक्के पावसाची कमतरता आहे. किंबहुना आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसाचा मध्य महाराष्ट्राला जास्त फायदा झाला. या पावसामुळे मराठवाड्यातील पावसाची कमतरता कमी होईल. गेल्या २४ तासांत विदर्भ, कोकण आणि गोवा या प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस नोंदविण्यात आला. मध्य महाराष्ट्रातही हलक्या पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, २३ आॅगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यासाठी अंदाज
२२ आॅगस्ट : कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
२३ ते २५ आॅगस्ट : कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
दामिनी देणार वादळ, विजांचा इशारा
इंडियन इस्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजीने ‘दामिनी’ नावाचे अॅप विकसित केले आहे. आयआयटीएमच्या वतीने देशभरात ४८ सेन्सर बसविले आहेत. केरळ, उत्तर भारत, उत्तर पूर्व भारत, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि हिमालय या विभागांत नवे सेन्सर बसविण्यात आले आहेत. यामुळे वादळ आणि विजांचे इशारे मिळण्यास मदत होत आहे. ३० मिनिटांपूर्वी यासंबंधीचे इशारे मिळत आहेत. ४० किमी परिसरातील माहिती आॅडिओ आणि एसएमएसद्वारे मिळत आहे.