मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस; पुढील तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 19:20 IST2020-03-01T19:19:42+5:302020-03-01T19:20:27+5:30
गुरुवारी पुन्हा विदर्भात पावसाची शक्यता

मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस; पुढील तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता
पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र व परिसरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी; तसेच विदर्भात अनेक ठिकाणी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा जोरदार वर्षाव झाला. पुढील तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, ५ मार्च रोजी विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ३५.९ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान नांदेड येथे १४.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
राज्यात आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सोलापूर ८, उस्मानाबाद ७, माढा ६, औरंगाबाद १.४ मिमी पावसाची नोंद झाली होती.सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा वर्षाव झाला़ औरंगाबाद, तसेच विदर्भातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
राज्यात २ ते ४ मार्च दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.५ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.