मुंबईत जोर'धार' पाऊस ! केईएम रुग्णालयात साचलं पावसाचं पाणी, रुग्णसेवेला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 02:33 PM2017-08-29T14:33:22+5:302017-08-29T20:21:59+5:30
मुंबई, दि. 29 - मुंबई शहरात 24 तासांत 152 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहेत. शिवाय, पुढील 24 तासांत ...
मुंबई, दि. 29 - मुंबई शहरात 24 तासांत 152 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहेत. शिवाय, पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचले आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असून नेहमी धावणा-या मुंबईचा वेग आज मंदावला आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. शिवाय, महापालिकेच्या सर्व शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पावसामुळे मुंबापुरीची तुंबापुरी झाली आहे. खबरदारी म्हणून पुण्याहून NDRF च्या दोन तुकड्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत. परळ येथील केईएम रुग्णालयातही पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे हॉस्पिटल प्रशासनासहीत रुग्णांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर पाणी साचल्याने जवळपास 30 रुग्णांना वरील मजल्यावर हलवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.
जोगेश्वरी, चर्चगेट जंक्शन आणि सात रस्ता येथे झाड पडल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. दादर टीटीजवळ पाणी साचल्याने वाहूतक कोंडी झाली आहे. वरळी, लालबाग, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचलं असून सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं आहे.
हायवेंवरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. पावसाचा परिणाम रेल्वेवरही झाला असून नेहमी उशिरा धावणारी मध्य रेल्वे एक ते दोन तास उशिराने धावत असून ठप्प झाल्याचीच परिस्थिती आहे. तांत्रिक अडचणींमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वांद्रे स्थानकात रोखण्यात आली आहे. हार्बर रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली असून वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. अनेक स्थानकांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने त्यांनाही नद्याचं स्वरुप आलं आहे. नेहमी गर्दी असणारं सीएसटी स्थानक तर ओस पडलं आहे.