एसटीकडे प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस
By admin | Published: December 23, 2016 05:15 AM2016-12-23T05:15:00+5:302016-12-23T05:15:00+5:30
बस स्थानकांवरील सोयी, अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा, अयोग्य तिकीट इत्यादी तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून एसटी
मुंबई : बस स्थानकांवरील सोयी, अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा, अयोग्य तिकीट इत्यादी तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी सर्वाधिक येत असल्याचे समोर आले. गेल्या दोन वर्षांत दोन हजारपेक्षा जास्त तक्रारी या गैरवर्तनाच्या आहेत. त्यामुळे चांगली वर्तवणूक ठेवून प्रवासी वाढवा अशा सूचना वारंवार करूनही त्याकडे कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्षच होत आहे. एकंदरीतच प्रवाशांच्या तक्रारी पाहता त्या त्वरित सोडवता याव्यात यासाठी ‘२४ तास कॉल सेंटर’ उभारण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांत एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत विविध कारणांनी मोठी घट झाली. पाच वर्षांत १५ कोटी प्रवासी कमी झाले असून हा सर्वात जास्त फटका आहे. त्यामुळे महामंडळाने नवीन वर्षातील जानेवारी महिन्यापासून तीन महिन्यांसाठी प्रवासी वाढवा विशेष अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रवासी वाढवण्यास मदत करणारे आगार, चालक, वाहकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. प्रवासी कमी होण्याची विविध कारणे असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत असून यामध्ये प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारी हेदेखील प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी गैरवर्तवणूक केल्याच्या २0१४-१५ मध्ये १ हजार २७ तक्रारी प्राप्त झाल्या. तर २0१५-१६ मध्ये हाच आकडा १ हजार १२ एवढा आहे. त्यानंतर सर्वाधिक तक्रारी बसमध्ये जागा न मिळण्याबाबतच्या आहेत. गेल्या वर्षी ३९९ तर या वर्षी ३८६ तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच एसटी बसचा नसलेला वक्तशीरपणा, अयोग्य तिकीट, प्रवास भाडे याबाबतच्याही तक्रारी एसटीकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत.