शहरातील मुक्या जीवांना ‘पाऊसबाधा’
By admin | Published: August 2, 2016 02:41 AM2016-08-02T02:41:35+5:302016-08-02T02:41:35+5:30
पावसाळी वातावरणात मनुष्याबरोबरच मुक्या जीवांनाही रोगाची लागण होत आहे.
प्राची सोनवणे,
नवी मुंबई- पावसाळी वातावरणात मनुष्याबरोबरच मुक्या जीवांनाही रोगाची लागण होत आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून शहरातील ६०० हून अधिक मुक्या जीवांना प्राणीप्रेमी संस्थांकडून उपचार करण्यात आले आहेत, तर दीडशेहून अधिक मुक्या जीवांना प्राण गमवावे लागले आहेत. पावसात झाडे उन्मळून पडल्याने पक्षी बेघर झाले आहेत.
पावसाळ््यात जखमी झाल्याने, भिजल्याने तसेच डिहायड्रेशनमुळे मुक्या जीवांची रोगप्रतिकारक शक्त कमी होते. अशा मुक्या जीवांवर वाशीतील सेक्टर २६ येथील भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने मोफत उपचार केले जात आहे. याठिकाणी एकाचवेळी १००० मुक्या जीवांवर उपचार केले जातात. संस्थेच्या वतीने त्वरित रुग्णवाहिका पोहोचवून तेथील जखमी मुक्या जीवांवर उपचार केले जातात. यामध्ये घार, घुबड, कबुतर, पोपट, सरपटणारे प्राणी,मांजरीची पिल्ले,कुत्रे यांचा समावेश आहे. खारघर ते पनवेल भागांमध्ये गाय, बैल यांच्या अपघातांचे प्रमाण वाढल्याची माहिती भूमी जीवदयाचे संस्थापक सागर सावला यांनी दिली. वाशीतील गंभीर जखमी प्राणी अथवा पक्ष्यांना या संस्थेच्या रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार केले जातात.
पावसाच्या फटक्याने नवी मुंबई तसेच पनवेल परिसातील जखमी पशू-पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली असून या प्राणीप्रेमी संस्थेच्या पुढाकाराने दिवसभरात दहापेक्षा अधिक मुक्या जीवांवर उपचार केले जातात. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने नाले, तलाव भरून वाहत आहेत. त्यामुळे रस्त्यावर येणारे सरपटणारे प्राणी जखमी होत असून पावसाच्या सरींचा फटका बसून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडत आहेत. जोरदार पावसाने घाबरून कुत्रे, मांजर रस्त्यावर येऊन वाहनांच्या धडकेत जखमी होत असल्याच्या घटनाही वाढत झाल्याची माहिती प्राणीप्रेमी संस्थांनी दिली आहे. वातावरणातील बदलामुळे पशू-पक्ष्यांना अशक्तपणा येत असून त्यांना टॉनिक देणे, जीवनसत्त्व, लसीकरण, मलमपट्टी असे औषधोपचार केले जात अल्याची माहिती या संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली.
>निवाऱ्याची गरज
पावसाच्या तडाख्याने झाडे पडल्याने पक्ष्यांची घरटी मोडली असून ते बेघर झाले आहेत. असे पक्षी मानवी वस्तीत आसरा घेत आहेत त्यामुळे पावसात भिजलेल्या पक्ष्यांना घराच्या खिडकीत निवारा देण्याचे आवाहन प्राणीप्रेमींनी केले आहे. पावसात भिजल्याने न्यूमोनिआचे आजार होत असल्याने या पक्ष्यांना ऊब मिळणे आवश्यक आहे त्याकरिता नागरिकांनी प्राणीप्रेमी संस्थांना मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे.