पुणेकरांना पावसाचा दिलासा.....
By admin | Published: July 3, 2016 03:04 PM2016-07-03T15:04:42+5:302016-07-03T15:18:50+5:30
गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांना दिलासा दिला असून धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांच्या काही दिवसांच्या पाण्याची तरतुद झाली आहे़
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ : गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांना दिलासा दिला असून धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने पुणेकरांच्या काही दिवसांच्या पाण्याची तरतुद झाली आहे़
पुणे शहरात रविवारी सकाळपर्यंत ७३़५ मिमी पावसाची नोंद झाली होती़ यंदाच्या हंगामात हा सर्वाधिक पाऊस आहे़ जून महिन्याभरात शहरात ५९ मिमी पाऊस झाला होता़ त्याच्यापेक्षा जास्त पाऊस एका दिवसात शहरात पडला आहे़
या पावसामुळे रविवारच्या सुट्टीची संधी साधून पुणेकरांनी मोठ्या संख्येने खडकवासला, पानशेत धरण परिसर तसेच सिंहगडावर धाव घेतली़ पावसाला आनंद लुटत कणसे, गरमागरम भज्ज्याचा आस्वाद घेतला़ मुळशी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मुळा नदीला पाणी आले असून नदी वाहू लागली आहे़
खडकवासला साखळी धरणक्षेत्रात प्रथमच इतका मोठा पाऊस झाला आहे़ रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात टेमघरमध्ये २०८ मिमी पावसाची नोंद झाली़ वरसगाव येथे १३४, पानशेत येथे १३५ आणि खडकवासला येथे ६२ मिमी पाऊस झाला़ या चारही धरणातील पाणीसाठा आज सकाळी ७़५९ टक्क्यांवर गेला आहे़. जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे़ धरणक्षेत्रात पडलेला पाऊस (मिमी) मुळशी २१५, पवना ३१६, कासारसाई ८६, कलमोडी ३२, चासकमान २८, भामाआसखेड ५७, आंध्र ६६, वडिवळे १०१, गुंजवणी १२२, भाटघर ४३, निरा देवघर १०७, वीर २५, नाझरे १२, पिंपळगावे जोगे १५, माणिकडोह २८, येडगाव ४, वडज ११, डिंभे२४, घोड ६ मिमी पावसाची नोंद झाली होती़