पावसाचे पुनरागमन : विदर्भात नागपूरसह भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 01:01 AM2017-08-20T01:01:15+5:302017-08-20T01:02:10+5:30

तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अखेर शनिवारी राज्यात पुनरागमन झाले. विदर्भात नागपूरसह भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.

 Rainfall of rain: Bhandara, Chandrapur and Gadchiroli districts in Vidarbha region with heavy rainfall | पावसाचे पुनरागमन : विदर्भात नागपूरसह भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी

पावसाचे पुनरागमन : विदर्भात नागपूरसह भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी

Next

मुंबई : तीन आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अखेर शनिवारी राज्यात पुनरागमन झाले. विदर्भात नागपूरसह भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. दुष्काळाचे ढग दाटलेल्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मात्र दोन महिन्यांनी रिपरिपच झाली. पावसाअभावी मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक पिके जळाली आहेत.
मराठवाड्यात शनिवारी पावसाने जमीन काहीशी ओली झाली. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, वैजापूर, पैठण तालुक्यांत भूरभूर होती. जालना जिल्ह्यात हलक्या सरी झाल्या बीड, नांदेड, लातूर, परभणी,
हिंगोली येथेही वरुणराजाने हजेरी लावली. विदर्भात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे १०४.२० मिमी, चंद्रपूरमधील नागभीड येथे ११७.४० मि.मी. व गडचिरोलीतील भामरागड येथे ७१.१० मि.मी. पावसाची नोंद झाली.

खान्देश व मध्य महाराष्ट्र मात्र महिनाभरापासून दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. हवामान खात्याने १९, २० व २१ आॅगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र अपेक्षेनुसार तसा पाऊस झालेलाच नाही. केवळ मुंबईसह कोकणात शनिवारी दिवसभर दमदार पाऊस झाला.

हवामान खात्याचा
केवळ गडगडाट
मराठवाड्यात आतापर्यंत ३९ तालुक्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. विभागात एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस पैठण तालुक्यात ३२.६ टक्के झाला.

अकोला, बुलडाणा, यवतमाळला जोर कमी
विदर्भात ४९ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाचे असून धान, कापूस, सोयबीन व इतर तृण धान्ये महत्त्वाची पिके आहेत.
शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात मात्र पाऊस कमी आहे.

...तर बारामतीची साखर तोंडात घालेन
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर बारामती येथे मार्मिक टिप्पणी केली आहे.

Web Title:  Rainfall of rain: Bhandara, Chandrapur and Gadchiroli districts in Vidarbha region with heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.