शहरात दिवसभर पावसाची संततधार
By Admin | Published: September 22, 2016 05:31 AM2016-09-22T05:31:04+5:302016-09-22T05:31:04+5:30
पश्चिम बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातील उल्लेखनीय हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा मारा सुरूच आहे.
मुंबई : मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेली वातावरणीय चक्राकार स्थिती आणि पश्चिम बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातील उल्लेखनीय हवामान बदलामुळे मुंबईसह राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा मारा सुरूच आहे. बुधवारी राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागत असतानाच, गेल्या २४ तासांत मुंबईत १४२.६ मिलीमीटर एवढा पाऊस पडला. येत्या २४ तासांसाठी शहर आणि उपनगरात पावसाचा मारा कायम राहील, असा इशारा मुंबई हवामान खात्याने दिला आहे. पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीलगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याचा हा परिणाम आहे.
>डहाणूत विक्रमी पाऊस
पालघर : डहाणूत गेल्या २४ तासांत ७० वर्षांतील विक्रमी असा ५५२ मिमी. पाऊस झाला. गेल्या ४८ तासांत पालघर, बोईसर, डहाणू येथे मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली होती. घरे, दुकाने, बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे खूप नुकसान झाले.