योजनांचा पाऊस, तरतुदींचा दुष्काळ
By Admin | Published: March 19, 2016 02:12 AM2016-03-19T02:12:59+5:302016-03-19T02:12:59+5:30
वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा पाऊस पाडला खरा; पण त्यासाठी अल्प तरतूद केली. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री
मुंबई : वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा पाऊस पाडला खरा; पण त्यासाठी अल्प तरतूद केली. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियान’ राबविले जाणार असले तरी त्यासाठीची तरतूद केवळ एक कोटी रुपये आहे.
मुनगंटीवार यांनी चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यासाठी ‘नमामि चंद्रभागा’ योजना जाहीर केली. त्यासाठी २० कोटी रुपये खर्च केले जातील. बाळासाहेबांच्या नावे असलेल्या योजनेतून नवीन ग्रामपंचायतींचे बांधकाम, तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करणे, जि.प. प्रभाग बळकट करणे, तसेच ग्रामपंचायतींच्या नियोजनात महिलांच्या संस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी गृहमंत्री (दिवंगत) आर.आर.पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सुधीरभाऊंनी आजच्या अर्थसंकल्पात आर.आर. यांचे स्मारक सांगली जिल्ह्यात उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली. त्या वेळी विरोधी पक्ष सदस्यांनीही बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले.
थोरांच्या स्मारकांसाठी ५ कोटी
महाराष्ट्रातील थोर नेत्यांची स्मारके अन्य राज्यात कोणी उभारणार असेल तर त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून काही निधी देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली. ही तरतूद तुटपुंजी असल्याने केल्याने विरोधकांनी खिल्ली उडविली. त्यावर हा निधी मुंबईतील शिवरायांच्या स्मारकासाठी नाही; ते स्मारक भव्यच होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. (प्रतिनिधी)