राज्यात पावसाचा जोर ओसरला
By admin | Published: August 17, 2015 12:48 AM2015-08-17T00:48:23+5:302015-08-17T00:48:23+5:30
कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने विदर्भासह राज्याच्या काही भागात पडत असलेल्या पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. रविवारी गोंदिया व यवतमाळ
पुणे : कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने विदर्भासह राज्याच्या काही भागात पडत असलेल्या पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. रविवारी गोंदिया व यवतमाळ वगळता विदर्भ व मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणीच पाऊस पडला.
मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे विदर्भात पाऊस पुन्हा सक्रीय झाला होता. अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस झाला. पण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा नाहिसा झाला आहे. तसेच आग्नेय उत्तर प्रदेश आणि लगतच्या बिहार व ईशान्य मध्य प्रदेशाच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्रही विरून गेले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागातून पाऊस गायब झाला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यात गोंदियात सर्वाधिक १७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल महाबळेश्वरमध्ये ७ मिमी पाऊस पडला. यवतमाळमध्ये ०.४, नाशिक येथे १, सातारा येथे ०.३, मुंबईत ३ तर रत्नागिरी येथे १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणात जव्हार, कणकवली, कुडाळ, चिपळूण, देवगड, गुहागर, सावंतवाडी, संगमेश्वर, पोलादपूर, देवरूख, मंडणगड येथे पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रात इगतपुरी, महाबळेश्वर, एरंडोल, गगनबावडा, ओझरखेडा, पारोळा, पेठ, शाहूवाडी येथे पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात तुरळक ठिकाणे वगळता पाऊस पडला नाही. पुढील आठवडाभर राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)