विदर्भातील ८ जिल्ह्यांत पाणीसंकट, राज्यभरातील पावसाच्या सरासरीपेक्षा विदर्भात कमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 09:57 PM2017-09-28T21:57:13+5:302017-09-28T21:57:29+5:30
मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे - मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांतही कमी पाऊस झाला असून, तेथेही पुढील काळात पाणीसंकट उद्भवण्याची शक्यता आहे.
देशभरात यंदा मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण झाला असून, आता त्याने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या प्रवासात देशाच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असते. राज्यात परतीचा पाऊस हा साधारणपणे पर्जन्यछायेच्या प्रदेशात अधिक होतो. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रदेशांत मान्सूनने यंदा चांगला हात दिला असला तरी विदर्भाला त्याची अवकृपा सहन करावी लागली आहे. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात विदर्भात काही दिवसांचा अपवाद वगळता फारसा पाऊस झाला नाही. जो पाऊस झाला तो कमी दिवसात पडला. आता परतीचा पाऊस पडला तरी पावसाचा बँकलॉग इतका आहे की, विदर्भात सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुढील काळात पिके त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीसाठी लागणा-या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
मराठवाड्यात यंदा मान्सूनने भरपूर साथ दिल्याने नदी, धरणे भरून वाहत आहेत. जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असले तरी हिंगोली -२७, परभणी -२१, नांदेड -२१ टक्के या तीन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. औरंगाबाद -६, जालना -१ या जिल्ह्यांतही कमी पाऊस झाला आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस झाला असून त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यात सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५८ टक्के अधिक पाऊस पडला असून, त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात ५१ टक्के पाऊस झाला आहे. सिंधदुर्ग जिल्ह्यात धो धो पाऊस झाला असल्याचे दिसत असले तरी तो सरासरीपेक्षा ५ टक्के कमी आहे. धुळे जिल्ह्यात सरासरी ऐवढा पाऊस झाला आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (वजा)(टक्के)
गडचिरोली - २३, चंद्रपूर -३२, गोंदिया -३७, भंडारा -२७, यवतमाळ -३४, अमरावती -२९, अकोला -२२, वाशीम -२८, वर्धा -१४, नागपूर -३, हिंगोली २७, परभणी -२१, नांदेड -२१, नंदूरबार -१०, जळगाव -१४, औरंगाबाद -६, जालना -१, सांगली -१६, सिंधदुर्ग -५, कोल्हापूर -१६
सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्के)
अहमदनगर ५८, पुणे ५१, पालघर १७, ठाणे ३३, मुंबई ९, रायगड १७, रत्नागिरी ४, सातारा १६, सोलापूर २७, उस्मानाबाद २६, लातूर ३, बीड १३, बुलढाणा २