गावागावांत होणार पावसाची नोंद
By admin | Published: April 16, 2016 02:30 AM2016-04-16T02:30:22+5:302016-04-16T02:30:22+5:30
देशातील तब्बल सहा लाख गावांमध्ये पडणाऱ्या पावसाची नोंद करण्याची योजना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हाती घेतली आहे. पर्जन्यमानाचे चक्र बदलत असल्याने
- राजानंद मोरे, पुणे
देशातील तब्बल सहा लाख गावांमध्ये पडणाऱ्या पावसाची नोंद करण्याची योजना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हाती घेतली आहे. पर्जन्यमानाचे चक्र बदलत असल्याने देशाला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना पावसाची स्थिती तसेच कृषीविषयक सल्ला देण्याचे नियोजन आहे.
सध्या देशात शहर, तालुक्याची ठिकाणे, धरण पाणलोट क्षेत्र किंवा काही महत्त्वाच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याआधारे संपूर्ण शहर, तालुक्याची पावसाची सरासरी काढली जाते. आता ‘एक गाव एक पर्जन्यमापक यंत्र’ हे सूत्र निश्चित करण्यात आले असून देशातील तब्बल सहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेविषयी कृषी मौसम विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. एन. चटोपाध्याय म्हणाले की, देशाच्या भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास पावसाच्या प्रमाणात खूप वैविध्य आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या परिसरात पडलेल्या पावसाचे अचूक प्रमाण सांगणे तसे शक्य होत नाही. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविल्यास कमी अंतरावरील पावसाचे अचूक प्रमाण समजण्यास मदत होणार आहे. त्यानुसार तेथील पावसाच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना कृषीविषयक विविध मार्गदर्शन करणे शक्य होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित गाव किंवा परिसरात एखादी योजना राबविण्याबाबतही मदत होईल. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमापक बसविण्याचा मान यामुळे भारताला मिळणार आहे.
कर्नाटकमधून लवकरच या योजनेची सुरुवात होईल. येत्या पावसाळ्यात तेथील किमान शंभर गावांत यंत्रे बसविली जातील. तसेच सहा महिन्यांत किमान दोन राज्यांमध्ये ही यंत्रे बसविली जातील. गावा-गावांमधून पावसाची माहिती एसएमएसद्वारे एनआयसीकडे संकलित केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांना प्रशिक्षणही दिले जाईल.
- डॉ. एन. चटोपाध्याय, उपमहासंचालक, कृषी मौसम विज्ञान विभाग