पावसाचा तडाखा सुरूच; कोकण विभागात काही ठिकाणी रेड, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 06:18 AM2021-07-15T06:18:37+5:302021-07-15T06:20:20+5:30

पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.

The rains continue Red alert in some places in Konkan Orange alert in some places | पावसाचा तडाखा सुरूच; कोकण विभागात काही ठिकाणी रेड, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

पावसाचा तडाखा सुरूच; कोकण विभागात काही ठिकाणी रेड, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट

Next
ठळक मुद्देपावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार.रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट.

मुंबईसह महाराष्ट्रात बुधवारीदेखील मान्सूनचा तडाखा सुरूच होता. मंगळवारी आणि बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पावसाचा तुफान मारा गुरुवारीदेखील सुरूच राहणार असून, कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याला रेड तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत गुरुवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारी काही काळ पाऊस थांबला. सायंकाळी पुन्हा पावसाने वेग पकडला. मात्र सायंकाळी पावसाचा जोर संथ होता. पावसाची रिमझिम सुरू असतानाच एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. मंगळवारी रात्री ९ वाजता माझगाव येथील जम जम मस्जिदशेजारी असलेली संरक्षक भिंत कोसळून रिझवान सय्यद हे ज्येष्ठ नागरिक किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले, तर एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. १५ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या असून, गुरुवारी देखील मुंबईत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

१५ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. १६ जुलै रोजी देखील कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. 

१५ मिनिटांच्या अंतराने वर्तवणार हवामान अंदाज 
आता २४ तासांऐवजी १५ मिनिटांच्या अंतराने हवामान अंदाज वर्तवण्याचा विचार सुरू आहे, असे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी सांगितले. हवामान अंदाजांबाबतच्या वाढीव मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले अभिप्राय जाणून घेण्याच्या उद्देशाने आयआयटीएमने पवन आणि सौरउर्जा निर्मितीसाठी ‘हवामानशास्त्रीय भाकीत : सद्यस्थिती आणि भविष्यकालीन दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रामध्ये ते बोलत होते.

डॉ. एम राजीवन म्हणाले, ‘‘भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्था, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग यांसारख्या भूविज्ञान मंत्रालयाच्या संस्था पवन आणि सौर उर्जाविषयक हवामानाचे अंदाज जारी करत असतात. विविध हितधारकांकडून वाऱ्यांचा वेग, ढगांचे आच्छादन आणि सौर किरणोत्सार लहरीच्या अंदाजांची विचारणा होत असते. ऊर्जा क्षेत्राशी संबंधित हवामान शास्त्रविषयक भाकिते आणखी अचूक करण्यासाठी भूविज्ञान मंत्रालय २०२१ ते २०२६ या नियोजन कालावधीमध्ये या भाकितांशी संबंधित विविध प्रकारच्या कामांना आणखी बळकटी देणार आहे.

नव्या, नूतनक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवण्यासाठी, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्यासाठी आवश्यक पर्यायांची चाचपणी केली जात आहे. पवन ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी हवामानाचे भाकीत महत्त्वाचे असते. ताशी १५ किमीपेक्षा कमी गतीने वारे वाहणाऱ्या आणि डोंगराळ भागात पवनऊर्जा निर्मितीसाठी हवामानाचे भाकीत अचूक असणे आवश्यक असते. सौर उर्जा निर्मितीसाठी निरभ्र आकाश असताना भाकीत करणे सोपे असते; मात्र ढगाळ वातावरण असताना सूर्यप्रकाशाबाबतचे भाकीत करणे अवघड होते, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: The rains continue Red alert in some places in Konkan Orange alert in some places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.