पावसाने बळीराजा सुखावला!
By admin | Published: June 13, 2017 01:06 AM2017-06-13T01:06:26+5:302017-06-13T01:06:26+5:30
कोकण किनारपट्टीवरून घाटमाथ्यावर आलेल्या मान्सूनची दोन दिवसांत दमदार वाटचाल झाली असून मऱ्हाटी मुलुखात सर्वदूर पाऊस बरसू लागला आहे. सोमवारी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/पुणे : कोकण किनारपट्टीवरून घाटमाथ्यावर आलेल्या मान्सूनची दोन दिवसांत दमदार वाटचाल झाली असून मऱ्हाटी मुलुखात सर्वदूर पाऊस बरसू लागला आहे. सोमवारी कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला असून पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. सोलापूर शहर तर जलमय झाले आहे. मराठवाड्यात वीज पडून सात महिलांचा तर विदर्भात तिघांचा मृत्यू झाला.
मान्सूनने सोमवारी मध्य अरबी समुद्र, कोकणचा आणखी काही भाग, उत्तर अरबी समुद्र, वलसाडसह गुजरातचा काही भागात, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमेचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा आणखी काही भाग, उत्तर बंगालच्या उपसागराचा बहुतांश भागात प्रवेश केला़
मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही भाग वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा, तुळजापूर, उमरगा, कळंब, भूम, उस्मानाबाद तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली़ रविवारी तुळजापूर, लोहाऱ्यासह भूम परिसरातही चांगला पाऊस झाला. नांदेड शहर व परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास दमदार पाऊस झाला. नायगाव, लोहा शहरातही पावसाने हजेरी लावली़ लातूर जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस अहमदपूर, चाकूर व देवणी तालुक्यात झाला आहे़ शिरूर अनंतपाळ, औसा, चाकूर तालुक्यात अनेक ठिकाणी पेरण्या सुरू आहेत़
परभणी शहर व परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला़ पाथरी, सेलू, मानवत, पूर्णा आदी ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली़ हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. औंढा तालुक्यातील टाकळगव्हाण येथे शेतात काम करीत असताना वीज पडून तीन महिला जखमी झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. पाटोदा, माजलगाव, केज, आष्टी, अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. हर्सूल, कर्जत, मोहोळ ७०, माढा, सोलापूर, त्र्यंबकेश्वर ६०, अक्कलकोट, शेवगाव, सिन्नर ५०, गगनबावडा, महाबळेश्वर, ओझर (नाशिक) ४०, चंदगड, ओझरखेडा, पेठ, राहुरी ३०, इंदापूर, जामखेड , राहाता, सांगोला २०, अहमदनगर, दहिवडी, दिंडोरी, इगतपुरी, खंडाळा बावडा, वडज, माळशिरस, पारनेर, राधानगरी, श्रीगोंदा येथे १० मिमी पाऊस पडला़
मराठवाड्यात सात महिला मृत्युमुखी
मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात कारला (ता. उमरी) येथे शेतात काम असलेल्या पाच महिलांचा वीज कोसळून मृत्यू झाला.
शोभाबाई देवीदास जाधव (वय ४८), मोहनाबाई गंगाधर सोनवणे (४८), शोभाबाई संभाजी भूताळे (४५, शेतमालक), रेखाबाई मारोती पवळे (३६) आणि शेषाबाई माधव गंगावणे (४९) अशी मृतांची नावे आहेत.
दुसरी दुर्घटना जालना जिल्ह्यात खडकावाडी (ता. घनसावंगी) येथे घडली. शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून सबीना बी शेख इकबाल शेख नूर (४०), आणि सीमा शेख इकबाल शेख नूर (१९) या मायलेकी मृत्युमुखी पडल्या.
विदर्भात वीज पडून तिघांचा मृत्यू
विदर्भात चंद्रपूर, यवतमाळ वर्धा येथे दमदार सरी कोसळल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात वीज कोसळल्याने शेतात काम करीत अससेल्या तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. लटारी रामा वाटगुरे (वय ६५), वर्षा रवींद्र गावतुरे (३२, दोघेही रा. पद्मापूर जि. चंद्रपूर ) आणि प्रकाश गुलाबराव नेवारे(४०) अशी मृतांची नावे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याने एक बालिका बेपत्ता झाली आहे.