पावसाळापूर्व तयारी अद्याप काठावरच
By admin | Published: May 10, 2014 04:50 PM2014-05-10T16:50:57+5:302014-05-10T20:37:06+5:30
महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी पावसाळापूर्व कामे करण्याचे आदेश दिले. तरीही मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांच्या समन्वया अभावी नदी-नाल्यातील राडारोडा तसाच पडलेला आहे.
- आयुक्तांचे आदेश धाब्यावर; नाल्यात अजूनही राडारोडा
पुणे : महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी पावसाळापूर्व कामे करण्याचे आदेश दिले. तरीही मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांच्या समन्वया अभावी नदी-नाल्यातील राडारोडा तसाच पडलेला आहे. स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकात दरवर्षी पाणी साचते, त्याठिकाणी उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
गतवर्षांप्रमाणे यंदाही महापालिकेत पावसाळापूर्व नियोजनासाठी आयुक्त देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्तांना मुख्य खात्याच्या सहकार्याने तातडीने नदी-नाल्यांची साफसफाई, रस्त्यांचे डांबरीकरण, राडारोडा उचलणे, खड्डे बुजविणे आदी कामे करण्याचे आदेश आठवड्याभरापूर्वी दिले. त्यानुसार स्थायी समितीनेही पावसाळापूर्व कामांसाठी १० कोटीचा निधीला मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेतील रस्ते, उद्यान, ड्रेनेज आदी मुख्य खात्यातील अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
त्यापार्श्वभूमीवर महापौर चंचला कोद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या अधिका-यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे, सभागृहनेते सुभाष जगताप, गटनेते अशोक हरणावळ, आयुक्त विकास देशमुख, सहआयुक्त सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त विवेक खरवडकर, उपायुक्त मधुकांत गरड, सुनिल केसरी आदी उपस्थित होते. त्यावेळी महापालिकेच्या मुख्य व क्षेत्रीय अधिका-यांनी परस्पराशी समन्वय ठेवून ३१ मेपूर्वी सर्व कामे करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.
पावसाळापूर्व कामे...
* नदी- ओढ्यातील राडारोडा उचलणे
* पावसाळी गटारे व ड्रेनेजलाईनची स्वच्छता
* नैसर्गिक प्रवाहातील अडथळे व अतिक्रमण हटविणे
* नदीपात्रातील झोपडपीधारकांचे बीएसयुपी प्रकल्पात स्थलांतर
* नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकणे
* जुने वृक्ष काढून टाकणे, फाद्या छाटणे
* धोकादायक वाडे व इमारतीवर कारवाई करणे.