पावसाचा जोर ओसरला

By admin | Published: October 4, 2016 04:17 AM2016-10-04T04:17:40+5:302016-10-04T04:17:40+5:30

एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे.

The rains of the rain fell | पावसाचा जोर ओसरला

पावसाचा जोर ओसरला

Next

औरंगाबाद/पुणे: एखादा अपवाद वगळता मराठवाड्यात पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. नदी, नाल्यांना आलेला पूर ओसरत असून जनजीवनही पूर्वपदावर येत असले तरी पिकांसह मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, बोरी या प्रमुख नद्यांसह इतर ओढे-नद्यांना पूर आला आहे़ या पावसामुळे लाखो एकरावरील खरिप पिकांचे नुकसान झाले असून, शेकडो घरांची पडझड झाली आहे़ आजवर जिल्ह्यात १०६़४७ मिमी पावसाची नोंद झाली. येथील १३३ प्रकल्प तुडुंब भरले असून, ५ प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत़

लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर, जळकोट, उदगीर आणि चाकूर तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले असून, एनडीआरएफच्या पथकाचे मदतकार्य अद्यापही सुरूच आहे. पुरात अडकलेल्या ७२ जणांचे प्राण वाचविण्यात या पथकाला यश आले असून, रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जळकोट तालुक्यातील नऊपैकी सहा गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मांजरा, तावरजा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात १२२.३५ टक्के पाऊस झाला. शनिवार व रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे बीड तालुक्यातील हिंगणी (खुर्द) या गावात मांजरा नदीचे पाणी घुसल्याने २०० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. सोमवारी गावातील पाणी ओसरल्याचे नागरिकांनी सांगितले. परळी तालुक्यातील संगम या गावचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला होता. सोमवारी येथील जनजीवन सुरळीत झाले. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुराचे पाणी ओसरत आहे.

जळगाव-नंदुरबारमध्येही मुसळधार
जळगाव जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. तोंडापूर धरणातून पाणी सोडण्यात आले असून तितूर, गडद नदीला पूर आला आहे. चाळीसगावमधील मन्याड धरण १०० टक्के भरले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.


शारदीय नवरात्रौत्सवातील सोमवारी तिसऱ्या माळेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसांत उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे़

Web Title: The rains of the rain fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.