...वळीवाचा पाऊस जोर धरणार
By Admin | Published: May 11, 2017 03:00 AM2017-05-11T03:00:50+5:302017-05-11T03:00:50+5:30
राजस्थान तसेच उत्तरेकडून आलेल्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे एप्रिलमध्ये बाष्पयुक्त ढगांची निर्मिती न झाल्याने यंदा पूर्वमोसमी
विवेक भुसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजस्थान तसेच उत्तरेकडून आलेल्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे एप्रिलमध्ये बाष्पयुक्त ढगांची निर्मिती न झाल्याने यंदा पूर्वमोसमी पावसामध्ये मोठी घट झाली आहे़ संपूर्ण राज्यात आतापर्यंत सोलापूर वगळता बाकी सर्व ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस कमी किंवा जवळपास झालेला नाही़ परंतु, आता मेमध्ये सर्वदूर चांगला वळीवाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.
देशभरात एक मार्च ते एप्रिलअखेरपर्यंत साधारण ६५ मिमी पावसाची नोंद होते़ यंदा ६२ मिमी पाऊस झाला असून, जवळपास ४ टक्के पाऊस कमी नोंदविला गेला आहे़ देशभरातील २६ हवामान विभागापैकी केवळ २ विभागात जादा पाऊस झाला आहे. १२ विभागात सर्वसाधारण पाऊस झाला आहे़ १० विभागात २० ते ५९ टक्के कमी पाऊस झाला असून १२ विभागात ६० ते ९९ टक्के कमी पाऊस झाला आहे़ महाराष्ट्रातील चारही विभागात पूर्वमोसमी पाऊस कमी झाला आहे़
याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, आपल्याकडे एप्रिलमध्ये उत्तर व राजस्थानाच्या वाळवंटातून उष्ण व कोरडे वारे जास्त प्रमाणात आले़ त्यात अजिबात आर्द्रता नव्हती़ त्यामुळे ढगांची निर्मिती झाली नाही़ पश्चिम बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही़ त्यामुळे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्येही बाष्पाचे प्रमाण कमी होते़ त्यामुळे तापमानातही मोठी वाढ झाली आहे़ मेच्या पहिल्या आठवड्यात त्यात बदल झाला असून समुद्रावर जास्त दाब निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी ढगांची निर्मिती होत आहे़ उंच वाढीचे ढग निर्माण होऊ लागले आहेत़ पाच किमीपेक्षा उंच लांबीचे ढग निर्माण होऊ लागल्याने गारा पडायला लागल्या आहेत़ जो अनुभव आपल्याला दरवेळी एप्रिलमध्ये येतो, तो आता येत आहे़
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़
१२ मेला राज्यात संपूर्ण भागात तुरळक ठिकाणी पाऊस होणार असून, १३ व १४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे़ मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे़
प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३९़६, जळगाव ४२़२, कोल्हापूर ३७़१, महाबळेश्वर ३४़२, मालेगाव ४४, नाशिक ३९़१, सांगली ३९़४, सातारा ३९़५, सोलापूर ४०़५, मुंबई ३४़८, अलिबाग ३५़९, रत्नागिरी ३३़५, पणजी ३४़३, डहाणू ३५, उस्मानाबाद ३८़२, औरंगाबाद ४१, परभणी ४१़६, नांदेड ४१़५, बीड ४२, अकोला ४४़१, अमरावती ४१़८, बुलढाणा ४०़६, चंद्रपूर ४२़८, गोंदिया ४०़८, नागपूर ४२, वर्धा ४२़५, यवतमाळ ४१़५